राष्ट्रीय

Viral Accident Video : आनंद ठरला क्षणभंगुर! शोरूममधून बाहेर पडताच नवीन कारचा भीषण अपघात; बॅरिकेड तोडून दुचाकीला उडवले

दोघे गंभीर जखमी, अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

पुढारी वृत्तसेवा

सागर (शिवमोग्गा) : नवीन कार खरेदीचा आनंद काही क्षणही टिकला नाही. शोरूममधून गाडीची डिलिव्हरी घेऊन बाहेर पडताच अवघ्या काही सेकंदांत चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि भरधाव कार थेट मुख्य रस्त्यावरील बॅरिकेड्स तोडून एका दुचाकीवर जाऊन आदळली. या भीषण अपघातात दुचाकीवरील दोघे जण गंभीर जखमी झाले असून, शिवमोग्गा जिल्ह्यातील सागर शहरात ही धक्कादायक घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित व्यक्तीने सागर शहरातील एका नामांकित कार शोरूममधून नवीन गाडी खरेदी केली होती. कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आणि गाडीची पूजा करून चालकाने मोठ्या उत्साहात कार शोरूमच्या आवाराबाहेर काढली. मात्र, बाहेर पडताच अवघ्या काही सेकंदांत त्याचा एक्सेलरेटरवरील ताबा सुटला. अनियंत्रित झालेली कार वेगाने शोरूमबाहेरील सुरक्षा बॅरिकेड्स तोडून थेट मुख्य रस्त्यावर शिरली.

त्याच वेळी रस्त्यावरून जाणाऱ्या एका दुचाकीला या भरधाव कारने जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की दुचाकीचा चक्काचूर झाला आणि त्यावरील दोघे जण रस्त्यावर फेकले गेले. या अपघातात दुचाकीस्वार दोघेही गंभीर जखमी झाले असून, त्यांना स्थानिक नागरिकांच्या मदतीने तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

या अपघातात नव्याने खरेदी केलेल्या कारच्या दर्शनी भागाचेही मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून, कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. क्षणभराच्या निष्काळजीपणामुळे आनंदाच्या क्षणाचे रूपांतर अशा दुर्दैवी अपघातात झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT