Bank proof death case | बहिणीच्या मृत्यूचा पुरावा मागितला; सांगाडा घेऊन बँकेत हजर झाला! 
राष्ट्रीय

Bank proof death case | बहिणीच्या मृत्यूचा पुरावा मागितला; सांगाडा घेऊन बँकेत हजर झाला!

पुढारी वृत्तसेवा

भुवनेश्वर/किओंझर; पीटीआय : ओडिशात मंगळवारी एक भयंकर घटना घडली. मृत बहिणीच्या खात्यातून पैसे काढण्यासाठी पुरावा म्हणून एका व्यक्तीने तिचा सांगाडाच बँकेत नेल्याची घटना घडली. बँकेत सांगाडा पाहून अधिकार्‍यांची भंबेरी उडाली. किओंझर जिल्ह्यातील या घटनेने खळबळ उडाली.

डायनाली गावातील जितू मुंडा (50) हा थोरली बहीण कालरा मुंडा (56) हिच्या खात्यातील पैसे काढण्यासाठी मालिपोसी शाखेत गेला होता. बहीण वारल्याचे याआधीही सातत्याने सांगितल्याचा दावा त्याने केला. पण बँक अधिकारी तिला बँकेत घेऊन येण्याचा आग्रह धरत होते. याला कंटाळून जितूने दफन केलेला बहिणीचा सांगाडा बाहेर काढला. तो खांद्यावर घेऊन थेट बँक गाठली. बँकेत सांगाडा पाहून कर्मचारी घाबरले. तत्काळ पोलिसांना पाचारण केले.

सांगाडा ताब्यात घेऊन तो सन्मानाने दफन करण्यात आला. बँकेने मात्र ग्राहकाला प्रत्यक्ष हजर राहण्याची मागणी केली नव्हती. नियमानुसार मृत्यू दाखला आणि कायदेशीर कागदपत्रे आवश्यक असतात, तेच जितूकडे मागितले होते, असा खुलासा केला. या घटनेवरून विरोधकांनी भाजप सरकारला धारेवर धरले. तर ओडिशाचे महसूल मंत्री सुरेश पुजारी यांनी संबंधित बँक अधिकार्‍यांवर कडक कारवाई केली जाईल, असे म्हटले आहे.

प्रशासन हलले...

या घटनेने प्रशासनही हादरले. तातडीने हालचाली झाल्या. कायदेशीर प्रक्रिया तूर्त बाजूला ठेवून जितू मुंडाला आर्थिक मदत देण्यात आली. जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले की, बँकेत जमा असलेले 19,300 रुपये जितू मुंडांंना कोणत्याही अडथळ्याविना मिळावेत यासाठी तहसीलदारांनी बँक अधिकार्‍यांशी समन्वय साधला. त्यानुसार मुंडा यांना व्याजासह 19,402 रुपये सुपूर्द करण्यात आले. या प्रकरणाची सविस्तर चौकशी सुरू आहे. खातेदार कालरा मुंडा यांच्या मृत्यू दाखल्यासाठीचा अर्ज सार्वजनिक आरोग्य केंद्रात दाखल केल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT