कोलकाता; वृत्तसंस्था : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. मतदार यादीत घुसखोर असल्याच्या भाजपच्या दाव्यांवर त्यांनी सवाल उपस्थित करत, ‘जर मतदार यादीत घुसखोर असतील, तर मोदींना घुसखोरांनीच निवडून दिले असा अर्थ होतो. त्याच मतांवर मोदी जिंकले आहेत. त्यामुळे मोदींनी आधी राजीनामा दिला पाहिजे,’ असे प्रतिपादन ममतांनी केले.
दक्षिण दिनाजपूर येथे झालेल्या निवडणूक सभेत बोलताना ममता बॅनर्जी यांनी मतदार यादीतील कथित गोंधळाचा मुद्दा जोरदारपणे उपस्थित केला. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत वापरलेल्या यादीवर आता प्रश्न का उपस्थित केले जात आहेत. 2024 मध्ये वापरलेली मतदार यादी आता संशयास्पद कशी? घुसखोरीचा मुद्दा निवडणुकीपूर्वीच का उचलला जातोय, असे सवाल त्यांनी केले.
मालदा येथील घटना हा भाजप आणि निवडणूक आयोगाचा पूर्वनियोजित संयुक्त कट आहे. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी वातावरण तयार केले जात आहे. एमआयएमचे असदुद्दीन ओवैसी आणि तृणमूलमधून बाहेर काढलेले हुमायून कबीर यांच्यामुळे राज्याची प्रतिमा मलिन झाली आहे. कोणीही उकसवले तर बळी पडू नका आणि कायदा हातात घेऊ नका. नागरिकांनी संयम बाळगावा, असे ममता म्हणाल्या.
ममता बॅनर्जी म्हणाल्या, न्यायिक अधिकार्यांना तासन् तास वेढा घालण्यात आला. त्याला एमआयएम आणि आयएसएफ जबाबदार आहेत. काँग्रेस आणि भाजपने या घटनेला चिथावणी दिली. बाहेरील लोकांना राज्यात प्रवेश सुलभ करण्यासाठी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अधिकार्यांच्या बदल्या केल्या जात आहेत. सीआरपीएफच्या वाहनांद्वारे पैसे वाहून नेले जात आहेत. माझ्याकडे याचे पुरावे आहेत आणि योग्य वेळी ते उघड करेन. अमित शहा बंगालमध्ये 15 दिवस ठाण मांडणार आहेत; पण त्याचा फायदा भाजपला होणार नाही. उलट भाजपची मतांची टक्केवारी घटेल, असेही ममता म्हणाल्या.