कोलकाता : पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या कालीघाट येथील घरासमोरच त्यांच्यावर एका महिलेने प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचा खळबळजनक आरोप तृणमूल काँग्रेसच्या वतीने करण्यात आला आहे. हातात चाकू घेऊन आलेल्या एका महिलेने ममता बॅनर्जी यांच्यावर थेट हल्ला चढवण्याचा प्रयत्न केला, असा दावा तृणमूलच्या खासदार दोला सेन यांनी केला आहे.
या गंभीर घटनेची माहिती त्यांनी कालीघाट पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांना ईमेलद्वारे कळवून तातडीने कारवाईची मागणी केली आहे. या घटनेनंतर राज्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
खासदार दोला सेन यांच्या माहितीनुसार, ही घटना मंगळवारी सायंकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास घडली. ममता बॅनर्जी, पक्षाचे नेते वैश्वानर चट्टोपाध्याय आणि त्या स्वतः कालीघाट मिलन संघाच्या पूजेसाठी जात होत्या. त्या वेळी तन्निष्ठा साहा नावाच्या महिलेने ममता बॅनर्जी यांच्या दिशेने धाव घेत त्यांना ‘आत्या’ (पिसी) अशी हाक मारली आणि अचानक त्यांच्यावर झडप घालण्याचा प्रयत्न केला. ती महिला नशेत धुंद होती, तसेच तिने स्वतःची ओळख ‘सिव्हिक व्हॉलिंटिअर’ आणि ममता यांची भाची अशी सांगितली. तिच्या हातात धारदार चाकू होता, असा थेट आरोप दोला सेन यांनी केला आहे. हल्ला करण्याचा प्रयत्न फोल ठरल्यानंतर ती महिला ममता बॅनर्जी यांच्या घराच्या प्रवेशद्वारासमोरच रस्त्यावर आडवी पडली आणि तिने अश्लील शिवीगाळ सुरू केली.
या घटनेदरम्यान सुरक्षेच्या मुद्द्यावरून दोला सेन यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. घटनेनंतर तेथे उपस्थित असलेल्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांकडे दाद मागितली असता, त्यांनी आपण राज्य पोलीस दलातील कर्मचारी असून हे क्षेत्र कोलकाता पोलिसांच्या अखत्यारीत येत असल्याने काहीही करू शकत नसल्याचे सांगत हात वर केले. इतकेच नव्हे तर पोलिसांनी संबंधित महिलेवर कारवाई करण्याऐवजी तिला बाजूला नेऊन चहा पाजल्याचा गंभीर आरोपही दोला सेन यांनी केला. माजी मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेतील या ढिसाळपणावर त्यांनी तीव्र चिंता व्यक्त करत, "राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्र्यांना सुरक्षित ठेवू इच्छित नाहीत का?" असा थेट सवाल उपस्थित करत भाजप सरकारकडे अंगुलिनिर्देश केला.
दरम्यान, या आरोपांवर पलटवार करताना राज्याचे उद्योगमंत्री तापस राय यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी हे माजी मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेबाबत पूर्णपणे सजग आणि दक्ष आहेत, असे सांगत त्यांनी ममता बॅनर्जी यांना त्यांच्याच कार्यकाळाची आठवण करून दिली. "गेल्या १५ वर्षांच्या सत्ताकाळात त्यांनी राज्यातील महिला, सर्वसामान्य नागरिक आणि व्यापारी वर्गाला सुरक्षित वातावरण दिले होते का? त्या स्वतःचा कार्यकाळ विसरल्या आहेत का?" असा खोचक टोला त्यांनी लगावला. मुख्यमंत्री या प्रकरणात योग्य ती पावले उचलतील, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी तातडीने कारवाई करत संबंधित महिलेला ताब्यात घेतले असून तिच्याकडे कसून चौकशी सुरू आहे.