राष्ट्रीय

TMC New Party Symbol : तृणमूल काँग्रेसचं नाव बदललं! दोन्‍ही गटांना मिळालं नवं नाव अन् नवं चिन्‍ह

निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीसाठी दोन्‍ही गटांनी सुचवलेल्‍या पर्यायांमधून केली निवड

पुढारी वृत्तसेवा

TMC New Party Symbol : पश्‍चिम बंगालमध्‍ये पुढील महिन्‍यात होणार्‍या विधानसभा पोटनिवडणुकीसाठी ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेस पक्षाला 'ममता ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस' हे नाव आणि 'फुटबॉल खेळाडू' हे चिन्ह देण्यात आले आहे. त्यांना पश्चिम बंगाल, मेघालय आणि त्रिपुरा या राज्यांमध्ये मान्यताप्राप्त राजकीय पक्ष म्हणून दर्जा देण्यात आला आहे. तर अरूप रॉय यांच्या नेतृत्वाखालील गटाला 'डेमोक्रॅटिक तृणमूल काँग्रेस' हे नाव आणि 'लिफाफा' (Envelope) हे चिन्ह देण्यात आले आहे.

पक्ष आणि चिन्ह गोठवल्यानंतर निवडणूक आयोगाने दिले होते आदेश

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत नामुष्कीजनक पराभवानंतर तृणमूल काँग्रेसमध्ये उभी फूट पडली. राज्यातील विधानसभा पोटनिवडणुकीसाठी पक्ष चिन्हावर दावा सांगण्यासाठी ममता बॅनर्जी गट आणि रूतब्रत बॅनर्जी गटाने निवडणूक आयोगाकडे धाव घेतली होती. अखेर गुरुवारी निवडणूक आयोगाने पक्षाचे नाव आणि चिन्ह गोठवले. त्यानंतर आज (दि. १८) ममता बॅनर्जी आणि रूतब्रत बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील गटांनी पर्यायी नावे आणि चिन्हांसाठी आपली पसंती आयोगाकडे सादर केली होती.

दोन्ही गटांसाठी प्रत्येकी तीन पर्याय

आयोगाने दोन्ही बाजूंना शुक्रवारी सकाळी ११ वाजेपर्यंत नावे आणि चिन्हांसाठी प्रत्येकी तीन पर्याय सादर करण्यास सांगितले होते. बंगालमधील दोन विधानसभा जागांसाठी ६ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी निवडणूक आयोग या तीन पर्यायांपैकी एकाची निवड करणार होते.

फुटबॉल, बॅट, ‘ममता’....

ममता बॅनर्जी यांच्या गटाने पक्षाच्या नावासाठी ममता तृणमूल काँग्रेस, तृणमूल काँग्रेस ममता आणि तृणमूल ममता काँग्रेस असे तीन पर्याय सुचवले होते. तसेच, या गटाने निवडणूक चिन्हासाठी दोन पर्याय सादर केले होते. यामध्‍ये एका पर्यायात फुटबॉल खेळाडू तर दुसरा पर्याय क्रिकेट बॅट होता.

लिफाफा, टॉर्च, फळा...

पश्चिम बंगाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते रिताब्रत बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील अरूप रॉय यांच्या गटानेही पक्षाच्या नावासाठी नॅशनलिस्ट तृणमूल काँग्रेस, डेमोक्रॅटिक तृणमूल काँग्रेस आणि वेस्ट बंगाल तृणमूल काँग्रेस अशी नावे सुचवली होती. तर पक्ष चिन्ह म्हणून लिफाफा, टॉर्च आणि फळा हे तीन पर्याय सुचवले होते. दरम्‍यान, हा लढा सामूहिक नेतृत्व आणि एका व्यक्तीचे वर्चस्व यांच्यातील आहे," असे बंडखोर गटाचे नेते रिताब्रत बॅनर्जी यांनी म्हटले आहे.

निवडणूक आयोगाने पक्षाचे नाव आणि चिन्ह गोठवले

गुरुवारी दिलेल्या अंतरिम आदेशात निवडणूक आयोगाने म्हटले आहे की, "रेकॉर्डवरील सर्व माहितीचा सखोल विचार करण्यात आला. आयोगाचे असे मत आहे की 'ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस'मध्ये दोन प्रतिस्पर्धी गट आहेत; एक गट ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली आहे आणि दुसरा अरूप रॉय यांच्या नेतृत्वाखाली. दोन्ही गट आता आपणच मूळ पक्ष असल्याचा दावा करत आहेत. त्यामुळे, या वादावरील अंतिम निर्णय येईपर्यंत दोन्ही गटांना पक्षाचे नाव आणि 'फुले आणि गवत' हे चिन्ह वापरण्याची परवानगी दिली जाणार नाही. आता विधानसभा पोटनिवडणुकीत दोन्ही गट आपापल्या गटासाठी जी नावे निवडतील त्या नावांनी ओळखले जातील (त्यात त्यांची इच्छा असल्यास मूळ पक्ष 'ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस'शी संबंध दर्शवणाऱ्या नावांचाही समावेश असू शकतो). तसेच, सध्याच्या पोटनिवडणुकांसाठी निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या 'मुक्त चिन्हांच्या' यादीतून दोन्ही गट जी वेगळी चिन्हे निवडतील, ती त्यांना दिली जातील."

ममता यांना मोठा धक्का

तृणमूलचे नाव आणि चिन्ह गोठवण्याचा निवडणूक आयोगाचा निर्णय ममता बॅनर्जी यांच्यासाठी मोठा धक्का आहे. बंडखोर गटाने या निर्णयाचे स्वागत केले आणि भाजपने बॅनर्जींचा पक्ष आता मृत्यूशय्येवर असल्याचा दावा त्यांनी केला. तर ममता बॅनर्जी समर्थकांनी आयोगाचा निर्णय "बेकायदेशीर" असल्याचे म्हटले आहे. नंदीग्राम आणि रेजीनगर मतदारसंघात ६ ऑक्टोबर रोजी पोटनिवडणुका होणार आहेत. ममता बॅनर्जींचा गट आणि बंडखोर गट या दोघांनीही या दोन पोटनिवडणुकांसाठी उमेदवार उभे केले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT