पुढारी ऑनलाईन डेस्क : तृणमूल काँग्रेस पक्षाची केंद्रात सत्ता असती तर आम्ही महिला डॉक्टरांच्या हत्येतील आरोपींना ७ दिवसांच्या आत फाशीची शिक्षा दिली असती, असा दावा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला. काेलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, यासाठी आम्ही आंदोलन सुरू करणार आहोत, अशी घोषणाही त्यांनी या वेळी केली. आज (दि.२८ ऑगस्ट) तृणमूल काँग्रेस विद्यार्थी संघटनेच्या मेळाव्यात त्या बोलत होत्या.
या वेळी ममता बॅनर्जी म्हणाल्या की, कोलकातामधील हॉस्पिटलमध्ये प्रक्षिणार्थी महिला डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा तपास सीबीआय गेली १६ दिवस करत आहे. केंद्र सरकारला पीडितेला न्याय देणार म्हणत होतं; मग कुठे आहे न्याय, असा सवाल करत या प्रकरणाचा तपास भरकटविण्याचा कट रचला जात आहे. बंदच्या नावाखाली पश्चिम बंगाल राज्यची बदनामीचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
बलात्कार प्रकरणी आम्ही पुढील आठवड्यात विधानसभेत राज्यातील कायद्यात दुरुस्ती करणार आहोत. बलात्काराच्या दोषींना फाशीची शिक्षा देऊ, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. भाजप एआयचा वापर करून मोठ्या प्रमाणावर सायबर गुन्ह्यांमध्ये गुंतत आहे, ज्यामुळे सामाजिक अशांतता निर्माण होत आहे, असा आरोपही ममता बॅनर्जी यांनी केला.