कोलकाता : आय-पीएसी या तृणमूल पक्षाच्या राजकीय सल्लागार कार्यालयावर या संस्थेच्या प्रमुखांच्या निवासस्थानावर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) छापे टाकल्यानंतर दुसर्याच दिवशी, तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली. आय-पीएसीचेे प्रमुख प्रतीक जैन यांच्या निवासस्थानावर ईडीने केलेल्या कारवाईनंतर हा निषेध करण्यात आला. तृणमूल काँग्रेसने आरोप केला आहे की, या छाप्यांदरम्यान तपास यंत्रणेने पक्षाची अंतर्गत माहिती आणि निवडणुकीची रणनीती मिळवण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, कोलकाता उच्च न्यायालयाने ममता बॅनर्जी यांच्यावर एफआयआर दाखल करण्यासंदर्भातील ईडीच्या याचिकेवरील सुनावणी तहकूब केली. यानंतर ईडीने ममता बॅनर्जी यांच्या हस्तक्षेपाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. यापूर्वीच्या कारवाईविरोधात आंदोलन करताना आपल्याला जबरदस्तीने हटवण्यात आल्याचा दावा तृणमूलच्या नेत्यांनी केला होता. शांततापूर्ण आंदोलनाला पोलिसांनी रोखल्याचा आरोप पक्षाच्या नेत्यांनी केला.
या मुद्द्यावरून दिल्लीतही निदर्शने झाली. तिथे कर्तव्य भवनाजवळ आंदोलन करताना डेरेक ओब्रायन आणि महुआ मोईत्रा यांच्यासह अनेक तृणमूल खासदारांना ताब्यात घेण्यात आले. सुरक्षेच्या कारणास्तव या परिसरात जमावबंदीचे आदेश लागू होते, असे पोलिसांनी सांगितले.