पुढारी ऑनलाईन डेस्क : पश्चिम बंगालला अस्थिर करण्याचा कट आहे. सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) विविध भागातून पश्चिम बंगालमध्ये घुसखोरीला परवानगी देत आहे. बांगलादेशी दहशतवादी बंगालमध्ये येत आहेत. हा केंद्राचा डाव आहे, असा गंभीर आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला आहे. दरम्यान, बांगलादेशमधून होणार्या घुसखोरीमुळे पश्चिम बंगाल राज्यातील शांतता बिघडवली जात असल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं होतं. यानंतर आता ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी थेट बीएसएफवर गंभीर आरोप केले आहे.
ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे की, "बीएसएफ वेगवेगळ्या भागातून बंगालमध्ये घुसखोरी करू देत आहे आणि महिलांवर अत्याचार करत आहे. देशाच्या सीमा तृणमूल काँग्रेसच्या हातात नाही. तृणमूल काँग्रेस सीमेचे रक्षण करत नाही. ळे जर कोणी टीएमसीवर घुसखोरीला परवानगी दिल्याचा आरोप करत असेल, तर ते काम 'बीएसएफ'चेच आहे. सीमेच्या रक्षणाची जबाबदारी त्यांची आहे, असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे.
" घुसखोरीबाबत राज्यातील पोलिसांकडे सर्व माहिती आहे. त्याचबरोबर केंद्र सरकारकडेही माहिती आहे. मला राजीव कुमार (डीजीपी) आणि स्थानिक सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. मी याबाबत केंद्र सरकारला जाब विचारणारे पत्र लिहिणार आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. बंगालमध्ये कोणी दहशतवादी कारवायांना चालना देण्याचा प्रयत्न केल्यास तृणमूल काँग्रेस राज्यात आंदोलन करणे असा इशाराही त्यांनी दिला.
बॅनर्जी यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह म्हणाले की, पश्चिम बंगाल बांगलादेशी घुसखोरीची नर्सरी बनला आहे. राज्यात जो पकडला जात आहे तो बांगलादेशी आहे. या बांगलादेशीचे बहुतेक पत्ते पश्चिम बंगालमधीलच आहे. ममता बॅनर्जी सर्व काही मतांच्या लालसेपोटी करत आहेत. पश्चिम बंगालला बांगलादेशी मुस्लिम आणि रोहिंग्यांसाठी प्रवेशद्वार बनवत आहे. बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार होत आहेत आणि संपूर्ण जग याचे साक्षीदार आहे, असेही गिराराज सिंह यांनी म्हटले आहे.