पुढारी ऑनलाईन डेस्क : मल्याळम अभिनेता शाईन टॉम चाको ( Shine Tom Chacko ) याला केरळ पोलिसांनी आज (दि. १९) अटक केली. ड्रग्ज प्रकरणी (Drug Case) ही कारवाई करण्यात आली आहे. एर्नाकुलम टाउन नॉर्थ पोलिस स्टेशनमध्ये चार तासांहून अधिक चौकशीनंतर अभिनेता शाईन टॉम चाकोला अटक करण्यात आली.
शाईन टॉम चाको हा एक प्रसिद्ध मल्याळम अभिनेता आहे. त्याने अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम केले आहे. गेल्या काही महिन्यांपासून तो २०१५ च्या ड्रग्ज प्रकरणातील चौकशीमुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री विन्सी अलोशियसनेही त्याच्यावर ड्रग्जच्या नशेत गैरवर्तन केल्याचा आरोप केला होता.
बुधवारी रात्री उशिरा कोचीच्या कलूर येथील एका हॉटेलवर छापा टाकण्यात आला तेव्हा अभिनेता शाईन टॉम चाको पळून जाताना दिसला. हॉटेलमध्ये पोलिस पथकाला पाहून तो का पळून गेला, याबद्दल चौकशीसाठी अभिनेत्याला बोलावण्यात आले. पोलिसांनी समन्स बजावल्यानंतर तो आज सकाळी १० वाजताच्या सुमारास स्टेशनवर पोहोचला. चार तासांच्या चौकशीनंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चाको यांचे मोबाईल कॉल डेटा रेकॉर्ड आणि व्हॉट्सअॅप चॅट्स गोळा केल्याचे वृत्त आहे. पोलिसांनी कलूरमधील हॉटेलमधून पळून जाणाऱ्या अभिनेत्याचे सीसीटीव्ही फुटेज देखील जप्त केले आहे. मात्र पोलिसांना त्याच्या खोलीतून कोणतेही अंमली पदार्थ सापडले नाहीत.