लोणी (अहिल्यानगर) : महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे 60 लाख हेक्टरहून अधिक पिकाचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचा सविस्तर प्रस्ताव सादर करा. केंद्र सरकारकडून मदत करण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी क्षणाचाही विलंब करणार नाहीत, अशी स्पष्ट ग्वाही केंद्रीय गृह, तथा सहकार मंत्री अमित शहा यांनी रविवारी येथे दिली.
पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे नूतनीकरण आणि पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील, पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्यांचे अनावण शहा यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन, पंकजा मुंडे, बाबासाहेब पाटील, जयकुमार गोरे, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, डॉ. सुजय विखे पाटील आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
मंत्री शहा म्हणाले, केंद्र सरकारने राज्याला 2025-26 मध्ये 3132 कोटी रुपये दिले. त्यातील 1631 कोटी रुपये एप्रिलमध्येच दिले आहेत. अतिवृष्टीतील नुकसानग्रस्तांना मदतीसाठी राज्य सरकारने 2215 कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे. 31 लाखांहून अधिक शेतकर्यांना त्याचा लाभ होणार आहे. ईकेवायसीचे नियम शिथिल केले. कर्ज वसुली थांबविण्याचा निर्णय घेतला. शेतकर्यांचा विचार करणारे सरकार निवडून दिल्याने हे शक्य झाले, असे त्यांनी नमूद केले.
आम्ही औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर आणि अहमदनगरचे अहिल्यानगर असे नामांतर केले. शिवछत्रपतींचे अनुयायी असलेल्या या सरकारमुळेच हे शक्य झाले. आम्ही औरंगजेबाची टिमकी वाजवणारे नाही, अशा शब्दांत अमित शहा यांनी काँग्रेसवर निशाणा साधला.
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीवरून विरोधक महाराष्ट्र सरकारवर टीका करण्यात मग्न आहेत. मात्र, एनडीएमधील प्रत्येक आमदाराने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी एक महिन्याचे वेतन दिले आहे, याकडे अमित शहा यांनी विरोधकांचे लक्ष वेधले. हे सरकार शेतकर्यांचा हाकेला धावून जाणारे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पुणे ः राज्यात सुमारे 70 लाख एकरवरील पिकांचे नुकसान झाले असले तरीसुद्धा राज्य सरकारकडून मदतीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्यात आलेला नाही, असे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाऊन आले. पाठोपाठ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्राच्या दौर्यावर आहेत. मात्र, राज्याला केंद्राकडून मदत जाहीर झालेली नाही. मी केंद्राशी बोललो असता राज्याकडून अंतिम प्रस्तावच आला नाही, असे सांगण्यात आले. त्यामुळे राज्य सरकारने यात दिरंगाई न करता लवकरात लवकर प्रस्ताव सादर करावा, अशी मागणीही शरद पवार यांनी केली आहे.
आजवर अनेक राज्यकर्ते आले. मात्र साखरेचे भाव पडलेले असायचे. आता परिस्थिती बदलली आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. अतिवृष्टीमुळे राज्यासमोर गंभीर संकट उभे ठाकले आहे. या संकटातून उभारीसाठी केंद्राची मदत गरजेची आहे. 2010 पूर्वी केंद्र सरकारने 2 लाख कोटी मदत दिली होती. मात्र 2014 मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर केंद्र सरकारने राज्याला 10 लाख कोटींची मदत दिल्याचा उल्लेख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला.
राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा सविस्तर अहवाल येत्या दोन दिवसांत केंद्र सरकारला पाठवला जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, सहकार मंत्रालयाचा ताबा घेतल्यानंतर अमित शहा यांनी सहकारासाठी धडाडीने निर्णय घेतले. त्यामुळे सहकाराला स्वतःची मक्तेदारी समजणार्यांच्या तोंडचे पाणी पळाले, असा टोलाही त्यांनी शरद पवार यांचा नामोल्लेख न करता लगावला. सहकारात ‘सर्क्युलर इकॉनॉमी’ची जबाबदारी शहा यांनी टाकली असून ती रुजविण्याचे काम करावे लागणार आहे, असेही फडणवीस म्हणाले.
या कार्यक्रमात बोलताना अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा उल्लेख महाराष्ट्रातील ‘त्रिमूर्ती’ असा केला. हे तिन्ही नेते ‘चतुर नव्हे तर महाचतुर आहेत’, असे ते म्हणताच उपस्थितांत हास्याची लकेर उमटली.