Major Rishabh Singh Sambyal Pudhari
राष्ट्रीय

Major Rishabh Singh Sambyal: राष्ट्रपतींच्या ADCला लग्नही करता येत नाही? मेजर ऋषभ यांच्या खुलाशाने उडाली खळबळ; निवृत्तीचं कारण काय?

Major Rishabh Singh Sambyal Early Retirement: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे माजी ADC मेजर ऋषभ सिंह सांब्याल यांनी वयाच्या 30व्या वर्षी लष्करी सेवेतून निवृत्ती घेण्यामागचं कारण स्पष्ट केलं आहे.

Rahul Shelke

Major Rishabh Singh Sambyal Early Retirement: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे माजी ADC (Aide-de-Camp) मेजर ऋषभ सिंह सांब्याल यांनी वयाच्या अवघ्या 30व्या वर्षी लष्करी सेवेतून निवृत्ती घेतल्याने मोठी चर्चा रंगली होती. राष्ट्रपतींच्या ADC पदावर असताना ते सोशल मीडियावरही चांगलेच चर्चेत आले होते. मात्र, अचानक घेतलेल्या निवृत्तीच्या निर्णयामागे नेमकं कारण काय, याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात होते. आता मेजर ऋषभ यांनी एका पॉडकास्टमध्ये या निर्णयामागची वैयक्तिक कारणं सांगितली आहेत.

लष्कर सोडण्याचा कधीच विचार केला नव्हता

मेजर ऋषभ सिंह सांब्याल यांनी सांगितले की, लष्करात जाणं त्यांच्यासाठी केवळ करिअर नव्हतं, तर बालपणापासून पाहिलेलं एक स्वप्न होतं. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी आयुष्यातील एक दशकाहून अधिक काळ घालवला.

त्यामुळे लष्करी सेवा सोडण्याचा विचार त्यांनी कधीच केला नव्हता. मात्र, एका टप्प्यावर त्यांच्यासमोर स्वतःच्या महत्त्वाकांक्षा आणि आई-वडिलांप्रती असलेल्या जबाबदाऱ्या यापैकी एकाची निवड करण्याची वेळ आली.

स्वतःपेक्षा आई-वडिलांना दिलं प्राधान्य

ऋषभ यांनी सांगितलं की, या कठीण प्रसंगी त्यांनी स्वतःच्या करिअरपेक्षा आई-वडिलांसोबत राहण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या मते, आयुष्यात काही गोष्टींसाठी त्याग करावा लागतो आणि पालकांसाठी केलेला त्याग यापेक्षा मोठा असू शकत नाही.

“एक मुलगा म्हणून माझ्या काही जबाबदाऱ्या आहेत आणि त्या महत्त्वाच्या आहेत. मला निर्णय घ्यायचा होता. मला काहीतरी त्याग करावा लागणार होता. मला स्वतःची निवड करायची होती किंवा माझ्या आई-वडिलांची. मला स्वार्थी व्हायचं नव्हतं. ‘मी ते केलं असतं तर’ या विचारात मला आयुष्य घालवायचं नव्हतं.”

कुटुंबाशी चर्चा करून घेतला निर्णय

लष्करातून निवृत्ती घेण्याचा निर्णय अचानक किंवा घाईघाईने घेतलेला नव्हता, असंही ऋषभ यांनी स्पष्ट केलं. कुटुंबीयांशी चर्चा केल्यानंतर आणि सर्व बाजूंचा विचार करून त्यांनी हा निर्णय घेतला.

लष्करी कारकिर्दीचा शेवट अपेक्षेपेक्षा लवकर झाला असला, तरी देशसेवेत घालवलेल्या प्रत्येक क्षणाचा आपल्याला अभिमान असल्याचं त्यांनी सांगितलं.

राष्ट्रपतींच्या ADC पदावर असताना अनेक बंधनं

राष्ट्रपतींचे ADC म्हणून काम करताना अत्यंत कठोर प्रोटोकॉल आणि शिस्तीचं पालन करावं लागतं. या काळात वैयक्तिक आयुष्यावरही अनेक मर्यादा येतात, असं ऋषभ यांनी सांगितलं.

ADC म्हणून काम करताना लग्नासंदर्भातही कठोर नियम असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यांच्या कार्यकाळात ADC ला लग्न करण्याची परवानगी नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

‘लग्नासाठी निवृत्ती घेतली’ या चर्चेलाही पूर्णविराम

ऋषभ सिंह यांच्या निवृत्तीनंतर सोशल मीडियावर लग्नामुळे त्यांनी लष्कर सोडल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र, त्यांनी या चर्चांना स्पष्ट शब्दांत नकार दिला.

आपलं अद्याप लग्न झालेलं नाही आणि सध्या लग्न करण्याचाही कोणताही विचार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे त्यांच्या निवृत्तीचा निर्णय लग्नाशी संबंधित असल्याच्या चर्चांना त्यांनी पूर्णविराम दिला.

राष्ट्रपतींच्या ADC पदासाठी वैयक्तिक आयुष्याचा त्याग

राष्ट्रपतींच्या ADC पदाची जबाबदारी अत्यंत प्रतिष्ठेची असली, तरी त्यासाठी वैयक्तिक आयुष्यात अनेक तडजोडी कराव्या लागतात. कुटुंबापासून दूर राहणं, दीर्घकाळ व्यस्त राहणं आणि स्वतःसाठी अत्यंत कमी वेळ मिळणं, या गोष्टींचा सामना करावा लागतो, असं ऋषभ यांनी सांगितलं. सामान्य व्यक्तीच्या आयुष्यात सहज अनुभवता येणाऱ्या अनेक गोष्टींचा त्याग त्यांना या काळात करावा लागला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT