Major Rishabh Singh Sambyal  File Photo
राष्ट्रीय

Major Rishabh Singh Sambyal: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे एडीसी मेजर ऋषभ सिंह यांचा राजीनामा; का घेतली स्वेच्छानिवृत्ती?

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासोबत सावलीसारखे वावरणारे '४ पॅरा स्पेशल फोर्सेस'चे अधिकारी मेजर ऋषभ सिंह सांम्ब्याल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

मोहन कारंडे

Major Rishabh Singh Sambyal

नवी दिल्ली: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासोबत सावलीसारखे वावरणारे '४ पॅरा स्पेशल फोर्सेस'चे अधिकारी मेजर ऋषभ सिंह सांम्ब्याल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी भारतीय सैन्यातून मुदतपूर्व निवृत्ती (स्वेच्छानिवृत्ती) घेतली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे 'एडीसी' (Aide-de-Camp) म्हणून सेवा बजावताना ते आपल्या शिस्तबद्ध आणि तत्पर कार्यशैलीमुळे देशभर सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनले होते.

औपचारिकपणे आपले पद सोडल्यानंतर, २१ ऑगस्ट रोजी ऋषभ सिंह यांनी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपतींची भेट घेतली. या भेटीची फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले असून, राष्ट्रपती भवनाच्या अधिकृत डिजिटल फोटो लायब्ररीमध्ये त्यांचा 'माजी एडीसी' म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. त्यांनी या भेटीचे व्हिडिओ आणि फोटो पोस्ट करत, राष्ट्रपतींच्या मार्गदर्शनाबद्दल आणि आशीर्वादाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

२०२१ मध्ये पहिल्यांदा आले चर्चेत

सांम्ब्याल हे २०२१ मध्ये पहिल्यांदा प्रकाशझोतात आले. जाट रेजिमेंटमध्ये कॅप्टन असताना त्यांनी प्रजासत्ताक दिन परेडमध्ये रेजिमेंटच्या तुकडीचे नेतृत्व केले होते आणि 'सर्वोत्कृष्ट मार्चिंग तुकडी'ची ट्रॉफी जिंकली. त्यानंतर, त्यांनी ४ पॅरा (स्पेशल फोर्सेस) मध्ये सामील होण्यासाठी अत्यंत कठीण असलेली निवड प्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण केली आणि 'बलिदान बॅज' मिळवला. हा बहुमान मोजक्याच सैनिकांना मिळतो.

कोण आहेत मेजर ऋषभ सिंह सांम्ब्याल?

मेजर ऋषभ सिंह हे जम्मूतील लष्करी परंपरा असलेल्या एका डोगरा राजपूत कुटुंबातील आहेत. नॅशनल डिफेन्स अकादमी मधील तीन वर्षे आणि इंडियन मिलिटरी अकादमीमधील एका वर्षाच्या प्रशिक्षणानंतर त्यांनी अधिकारी म्हणून जवळपास आठ वर्षे सेवा बजावली. अशा प्रकारे ते एकूण १२ वर्षे लष्करात होते.

२०२४–२०२५ च्या सुमारास त्यांची राष्ट्रपतींचे 'एडीसी' म्हणून निवड झाली. हे सशस्त्र दलातील अत्यंत प्रतिष्ठित आणि महत्त्वाचे पद मानले जाते. या भूमिकेत अधिकाऱ्याला प्रोटोकॉल सांभाळणे, अधिकृत कार्यक्रम व दौऱ्यांमध्ये राष्ट्रपतींसोबत राहणे आणि अतिसंवेदनशील कार्यक्रमांचे नियोजन करणे यासारख्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात.

पावसात राष्ट्रपतींवर छत्री धरणे, भावुक प्रसंगी रुमाल देणे, मंदिराच्या पायऱ्यांवर त्यांना मदत करणे आणि सरकारी कार्यक्रमांत अत्यंत आदरपूर्वक वागणे... त्यांचे हे सर्व व्हिडिओ आणि फोटो व्हायरल झाले होते. सोशल मीडिया युझर्सनी तर त्यांना थेट 'नॅशनल क्रश' असे नाव दिले होते.

मुदतपूर्व निवृत्ती का घेतली?

राजीनाम्यानंतर इन्स्टाग्राम लाईव्ह आणि इतर व्हिडिओंच्या माध्यमातून सांम्ब्याल यांनी लोकांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. "वर्दी घालणे हे माझे लहानपणापासूनचे स्वप्न होते आणि ती उतरवण्याचा विचार मी कधीच केला नव्हता. मात्र प्रत्येकाच्या आयुष्यात असे काही प्रसंग आणि वळणे येतात, ज्यामुळे आयुष्य कायमचे बदलते."

हा निर्णय त्यांनी पूर्णपणे वैयक्तिक आणि कौटुंबिक कारणांमुळे घेतला असून, त्याला कुटुंबाचा पूर्ण पाठिंबा असल्याचे त्यांनी सांगितले. आपण मिळवलेल्या यशाबद्दल समाधानी असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. लग्नाचा सध्या कोणताही विचार नसल्याचे सांगत ते म्हणाले, "मी वेगवेगळ्या माध्यमातून आपल्या देशाच्या सेवेत योगदान देत राहीन." भविष्यातील आपल्या पुढील वाटचालीची घोषणा योग्य वेळी केली जाईल, असे संकेतही त्यांनी दिले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT