PM Narendra Modi  x
राष्ट्रीय

PM Narendra Modi : महाराष्ट्रात महायुतीचा मोठा विजय लोकभावना दर्शवतो, सर्व कार्यकर्त्यांचे आभार : पंतप्रधान मोदी

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : महाराष्ट्रात पुन्हा एकदा भाजप आणि महायुतीला मोठा पाठिंबा मिळाला आहे. राज्यातील जनतेला सुशासन आणि राज्याच्या गौरवशाली संस्कृतीचा आदर करणारे युतीचे सरकार हवे आहे, हे यावरून स्पष्ट होते. अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणूक निकालावर आनंद व्यक्त केला. त्यांनी महाराष्ट्रातील तमाम मतदारांचे आभार मानले तसेच पक्षाच्या आणि महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांचेही आभार मानले.

सोमवारी (दि. ९) रात्री सोशल मीडियावर व्यक्त होत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, राज्यात महानगरपालिका आणि नगरपालिका निवडणुकांमधील भाजप आणि महायुतीच्या घवघवीत यशानंतर, महाराष्ट्रातील जनतेने जिल्हा परिषद निवडणुकांमध्येही आम्हांला भक्कम जनादेश दिला आहे. महाराष्ट्र सरकारच्या ठोस कामगिरीबद्दल तसेच एनडीएच्या सुशासनाच्या दृष्टिकोनाबद्दल जनतेपर्यंत माहिती पोहोचवत, स्थानिक स्तरावर अथक परिश्रम करणाऱ्या महायुतीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांचे मी अभिनंदन करतो, असेही ते म्हणाले.

नगरपालिका आणि महानगरपालिका निवडणुकांमधील घवघवीत यशानंतर, आता ग्रामीण महाराष्ट्रानेही भारतीय जनता पक्ष आणि महायुतीला कौल दिला आहे. नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून, त्यात महायुतीने दणदणीत विजय मिळवत आपला वरचष्मा कायम राखला आहे. या विजयामुळे राज्याच्या कानाकोपऱ्यात महायुतीची लाट असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

ग्रामीण आणि शहरी महाराष्ट्राचा 'गुड गव्हर्नन्स'ला कौल

महानगरपालिकांच्या निवडणुकीत मिळालेल्या यशाची पुनरावृत्ती जिल्हा परिषदांमध्येही झाली आहे. राज्याच्या वैभवशाली संस्कृतीचे रक्षण करणारे आणि सर्वांगीण विकास साधणारे सरकारच जनतेला हवे आहे, यावर या निकालाने शिक्कामोर्तब केले आहे. शहरी भागासोबतच आता ग्रामीण जनतेनेही 'सुशासना'च्या मुद्द्यावर महायुतीवर विश्वास दाखवला आहे.

कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे फळ

या विजयाचे श्रेय महायुतीच्या मैदानावर राबणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला देण्यात आले आहे. राज्य सरकारच्या कामगिरीचा लेखाजोखा आणि एनडीएचा सुशासनाचा दृष्टिकोन तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यकर्त्यांनी अहोरात्र कष्ट घेतले. त्यांच्या याच परिश्रमामुळे महायुतीला ग्रामीण बालेकिल्ल्यांमध्येही भगवा फडकवता आला आहे, असेही यावेळी नमूद करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT