नवी दिल्ली; वृत्तसंस्था : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या हस्ताक्षरातील ‘ए थॉट ऑफ द डे’ या ऐतिहासिक हस्तलिखिताला सॅफ्रॉनआर्टच्या लिलावात तब्बल १६.२० कोटी रुपये (सुमारे १.७ दशलक्ष डॉलर) मिळाले. भारतीय ऐतिहासिक दस्तऐवजासाठी लिलावात मिळालेली ही आतापर्यंतची विक्रमी किंमत ठरली आहे. या हस्तलिखितात गांधीजींनी त्यांचे निकटवर्तीय सहकारी, शिष्य व प्रकाशक आनंद टी. हिंगोरानी यांच्यासाठी लिहिलेल्या ६८८ दिनांकित चिंतनपर नोंदींचा समावेश आहे. तब्बल २३ महिन्यत हे लेखन करण्यात आले.
हिंगोरानी हे गांधीजींच्या ऐतिहासिक दांडी यात्रेत सहभागी झालेले एकमेव सिंधी व्यक्ती होते. लिलावात लॉट क्र. ८० म्हणून सादर केलेले हे हस्तलिखित सर्वाधिक किंमत मिळवणारे साहित्य ठरले. सत्य, अहिंसा, सेवा, जीवन व आत्मचिंतन आदी विषयांवर गांधीजींनी या नोंदी लिहिल्या आहेत. या लेखनाचे संकलन ‘ए थॉट ऑफ द डे’ या पुस्तकात आहे.
दुर्मीळ दस्तऐवज
सॅफ्रॉनआर्टचे सहसंस्थापक दिनेश वझीरानी म्हणाले, हिंगोरानी संग्रह गांधीजींच्या जीवन व विचारांचा विलक्षण दस्तऐवज आहे. गांधीजींसारख्या व्यक्तिमत्त्वाकडे निकटच्या व्यक्तीसोबतच्या नात्याच्या माध्यमातून पाहण्याची संधी या संग्रहातून मिळते. या ६८८ नोंदी गांधीजींनी आचरणात आणलेल्या विचारांची दुर्मीळ झलक देतात.