नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा
राष्ट्रपिता महात्मा गांधींना स्मृतिदिनानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनकड, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी गांधी समाधीस्थळ असलेल्या राजघाटावर जाऊन आदरांजली वाहिली. तर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दिल्लीतील ३० जानेवारी मार्गावरील गांधी स्मृती येथे जाऊन आदरांजली वाहिली.
राष्ट्रपिता महात्मा गांधी स्मृतीदिनानिमित्त राजघाट या त्यांच्या समाधीस्थळी सर्वधर्मीय प्रार्थना सभा आयोजित करण्यात आली होती. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंसह सर्व प्रमुख मान्यवर या सभेला उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोशल मिडियावर आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले की, “पूज्य बापूंना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली अर्पण करतो. त्यांचे आदर्श आपल्याला विकसित भारत निर्माण करण्यास प्रेरित करतात. आपल्या राष्ट्रासाठी शहीद झालेल्या सर्व शूरवीरांना मी श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांच्या सेवेचे आणि बलिदानाचे स्मरण करतो” असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.
तर “गांधीजी फक्त एक व्यक्ती नाहीत, ते भारताचा आत्मा आहेत आणि आजही प्रत्येक भारतीयात जिवंत आहेत. सत्य, अहिंसा आणि निर्भयतेची शक्ती सर्वात मोठ्या साम्राज्याचीही मुळे हादरवू शकते, संपूर्ण जग त्यांच्या या आदर्शांपासून प्रेरणा घेते. राष्ट्रपिता महात्मा गांधींना त्यांच्या शहीद दिनानिमित्त कोटी कोटी प्रणाम”, आशा भावना राहुल गांधी यांनी व्यक्त केल्या.