नवी दिल्ली; वृत्तसंस्था : भारतातील अब्जाधीशांच्या संख्येत वाढ होत असून श्रीमंतांच्या यादीमध्ये महाराष्ट्र अग्रेसर असल्याचे ‘हुरून वेल्थ’च्या अहवालात म्हटले आहे. अहवालानुसार, भारतातील श्रीमंत घरांची संख्या जवळपास 200 टक्के वाढून 8,71,700 झाली आहे. 8.5 कोटी रुपयांपेक्षा जास्त नेटवर्थ असलेल्या अशा कुटुंबांची संख्या 2021 मध्ये 4,58,000 होती. हे प्रमाण दुपटीने वाढले असून, देशातील एकूण घरांच्या 0.31 टक्के आहे.
महाराष्ट्रात सर्वाधिक श्रीमंत असून हे राज्य देशात आघाडीवर आहे. महाराष्ट्रात 1,78,600 कुटुंबीयांना अब्जाधीशाची पार्श्वभूमी आहे. यापैकी मुंबईमध्येच 1 लाख 42 हजार अब्जाधीश आहेत. त्यामुळे मुंबई देशातील अब्जाधीशांची राजधानी बनली आहे. दिल्ली दुसर्या तर बंगळूर तिसर्या क्रमांकावर आहे. दिल्लीमध्ये 68,200 तर बंगळूरमध्ये 31,600 अब्जाधीश आहेत.
जगातील श्रीमंत शहरांच्या अहवालामध्येही भारतातील बंगळूर, दिल्ली आणि मुंबई या शहरातील श्रीमंतांची नोंद घेतली आहे. बंगळूरमध्ये गेल्या दहा वर्षांत अब्जाधीशांच्या संख्येत 120 टक्क्यांनी वृद्धी झाली आहे. तर दिल्ली आणि मुंबईतील श्रीमंतांच्या संख्येत अनुक्रमे 82 आणि 6 टक्क्यांनी वाढ झाल्याचे या अहवालात म्हटले आहे.