नवी दिल्ली ः महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख याच्यासह राष्ट्रीय स्तरावरील चार मल्लांना अवैध पिस्तूलप्रकरणी उत्तर प्रदेश आणि पंजाबमधून अटक करण्यात आली आहे. सिकंदर शेख हा मूळचा सोलापूर जिल्ह्यातील असून तो कोल्हापुरात सराव करतो. अटक केलेल्या इतर मल्लांमध्ये दानवीर (26) आणि बंटी (26) (दोघेही शेरगढ चौराहा, मथुरा, उत्तर प्रदेश), कृष्ण कुमार ऊर्फ हॅपी गुज्जर (22, नाडा गाव, एसएएस नगर) यांचा समावेश आहे.
पंजाबमार्गे येणार्या निधीतून कार्यरत असलेल्या अनेक राज्यांतील टोळ्यांशी या नेटवर्कचे संबंध असल्याचा मोहाली पोलिसांना संशय आहे. त्यामुळे पोलिस सजग असतानाच मथुरेतील दोन व्यक्ती मोहाली जिल्ह्यात शस्त्रे पोहोचवण्यासाठी घेऊन येत असल्याची त्यांना माहिती मिळाली. त्यावरून ही कारवाई करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. कारवाईवेळी सिकंदर हा मुल्लानपूर गरीबदास, मोहाली येथे होता, अशी सूत्रांची माहिती आहे.