नवी दिल्ली : 26 जानेवारी 2026 रोजी कर्तव्य पथ येथे होणारा प्रजासत्ताक दिन सोहळा यंदाही भारताच्या लष्करी सामर्थ्य आणि सांस्कृतिक वैविधतेचे दर्शन घडवेल. महाराष्ट्राच्या द़ृष्टीने विशेष गौरवाची बाब म्हणजे, यावर्षी राज्याची सांस्कृतिक ओळख असलेल्या गणेशोत्सवावरील आधारित चित्ररथाचा समावेश असणार आहे.
लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली. त्यामागील ऐतिहासिक संदर्भ या चित्ररथाच्या केंद्रस्थानी असेल. स्वातंत्र्य चळवळीदरम्यान केवळ जनजागृतीचे माध्यम म्हणून नव्हे, तर स्वदेशी, स्थानिक उत्पादन आणि सामुदायिक सहभागाचे प्रतीक म्हणूनही या उत्सवाचे महत्त्व आहे. गणेशोत्सवाने स्थानिक ते जागतिक ही संकल्पना कशी जिवंत केली आहे, याचा संदेश या चित्ररथातून दिला जाईल. दरम्यान, यावर्षीच्या संचलनाची थीम ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रीय गीतावर आधारित आहे. युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष अँटोनियो कोस्टा आणि युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयन प्रजासत्ताक दिन परेडसाठी प्रमुख पाहुणे असतील.
संचलनाची थीम वंदे मातरम्ची 150 वर्षे असणार आहे. यामध्ये तेजेंद्रकुमार मित्रा यांनी 1923 मध्ये वंदे मातरम्चे चित्रण करणार्या आणि वंदे मातरम् अल्बम (1923) मध्ये प्रकाशित झालेल्या चित्रांची मालिका कर्तव्य पथावर व्ह्यू-कटर म्हणून प्रदर्शित केली जाईल. परेडच्या शेवटी वंदे मातरम् बॅनर असलेले फुगे हवेत सोडण्यात येतील. संरक्षण सचिव राजेशकुमार सिंह यांनी यावर्षीच्या उत्सवासाठी नियोजित असलेल्या अनोख्या उपक्रमांची विस्तृत रूपरेषा पत्रकार परिषदेत स्पष्ट केली. कर्तव्य पथावर एनक्लोजरच्या पार्श्वभूमीवर वंदे मातरम्च्या ओळी असलेले जुने चित्र (पेंटिंग) तयार केले जाईल. मुख्य मंचावर फुलांच्या सजावटीने वंदे मातरम्चे रचनाकार बंकिमचंद्र चटर्जी यांना श्रद्धांजली वाहिली जाईल. संचलनात विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे 30 चित्ररथही सहभागी होणार आहेत.
राफेल, अपाचेसह 29 विमाने
यावेळच्या फ्लायपास्टमध्ये राफेल, ए 30, अपाचेसारखी 29 विमाने सहभागी होतील. मात्र, ‘तेजस’चा समावेश नसेल. कोरमध्ये 2024 मध्ये समाविष्ट झालेले बॅक्ट्रियन उंट, पहिल्यांदाच भारतीय स्थानिक जातींचे 10 श्वान, ज्यात मुधोळ हाऊंड, रामपूर हाऊंड, चिप्पिपराई, कोम्बई आणि राजपालयम यांचा समावेश आहे. तसेच, 6 पारंपरिक लष्करी श्वानही असतील.
अडीच हजार कलाकारांचा सहभाग
याशिवाय सुमारे 2,500 कलाकार सांस्कृतिक कार्यक्रम सादर करतील. या सोहळ्यासाठी देशभरातील विविध क्षेत्रांत महत्त्वाची कामगिरी करणार्या सुमारे 10,000 विशेष पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले आहे.
भैरव बटालियन
पहिल्यांदाच भैरव लाईट कमांडो बटालियनदेखील प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये भाग घेईल. ऑक्टोबर 2025 मध्ये भैरव बटालियनची स्थापना करण्यात आली. भैरव बटालियन ही भारतीय सैन्याची वेगवान आणि आक्रमकपणे काम करणारी बटालियन आहे. ती पॅरा स्पेशल फोर्सेस आणि नियमित इन्फंट्री युनिटस्मधील ऑपरेशनल अंतर कमी करते. आपत्कालीन परिस्थितीत अत्यंत अल्पवेळेत सूचना मिळाल्यानंतरही आक्रमणासाठी जलद प्रतिसाद देत कारवाई करते.
गणेशोत्सव : स्वदेशी आणि स्वावलंबी भारताचे प्रतीक
महाराष्ट्राच्या चित्ररथाच्या रचनेमागील संकल्पना स्वदेशी आणि स्वावलंबी भारत अशी आहे. शिल्पकला, सजावट, संगीत, प्रकाशयोजना, पर्यावरणपूरक गणेशमूर्ती आणि स्थानिक कारागीर, अशी एक संपूर्ण सामाजिक, आर्थिक वीण या सणात तयार होते. कुंभार, कारागीर, कलाकार, ध्वनी आणि प्रकाश तंत्रज्ञ, लघुउद्योग यामध्ये सक्रियपणे सहभागी होतात. त्यामुळे स्वावलंबी भारताचे स्वप्न बळकट होते. गणेशोत्सव हा केवळ एक धार्मिक उत्सव नाही, तर सामाजिक एकता, लोकसंस्कृती आणि नागरी सहभागाचा उत्सव आहे. कोरोना साथीनंतर डिजिटल, पर्यावरणपूरक गणेशोत्सव मॉडेलने राज्याला एक नवीन दिशा दिली आहे.