Ram Sutar Pass Away: महाराष्ट्रातील प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांचे निधन झाले आहे. त्यांना राज्य सरकारने नुकतेच महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित केले होते. हा राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. उत्तर प्रदेशातील नोएडा येथील राहत्या घरी वयाच्या १०० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. राम सुतार यांनी गुजरातमधील स्टॅच्यू ऑफ युनिटी हा सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा उभारला होता.
नुकतेच राम सुतार यांना महाराष्ट्राचे मुध्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या नोएडा येथील घरी जाऊन महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार दिला होता. हा राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. त्यांनी शिल्पकला क्षेत्रात केलेल्या दैदिप्यमान कामांसाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला होता.
राम सुतार यांचा जन्म १९ फेब्रुवारी १९२५ मध्ये धुळे जिल्ह्यातील गोंदुर गावात झाला होता. लहाण असतानाच त्यांना शिल्पकलेमध्ये रस निर्माण झाला होता. त्यांनी नंतर जेजे स्कूल ऑफ आर्टमध्ये शिकले तिथं त्यांनी सुवर्ण पदक देखील पटकावलं. त्यानंतर त्यांनी शिल्पकला क्षेत्रात आपले नाव कमावलं. त्यांच्या दर्जेदार कामांची लीस्ट खूप मोठी आहे.
राम सुतार यांनी १८२ मीटर उंचीचा जगातील सर्वात उंच स्टॅच्यू ऑफ युनिटी डिझाईन केला आहे. त्याचबरोबर त्यांनी भारतातील जवळपास ४५० शहरांमध्ये महात्मा गांधींचे शिल्प तयार करून पाठवले आहेत. त्यांच्या नावावर ४५ फूट उंचीचे चंबळ मॉन्युमेंट देखील आहे.
तसंच जुन्या संसद भवनासमोरील महात्मा गांधीजींच्या बसलेल्या पुतळ्याची संकल्पना अन् काम देखील त्यांच्याच नावावर आहे. तसेच त्यांनी कर्नाटकच्या विधान सौध इथं देखील महात्मा गांधीजींचा मोठा पुतळा साकारला. तसंच बंगळुरू आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरातील १०८ फूट उंच केम्पे गौडा यांचा पुतळा देखील साकारण्याचं श्रेय त्यांनाच जातं.