नवी दिल्ली : ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला. यानंतर राम सुतार यांनी राज्य सरकारचे आभार व्यक्त केले. माझ्या कामाबद्दल हा पुरस्कार दिला जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे आभार मानतो. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जगाच्या पाठीवर देशाचे नाव मोठे करत आहेत, जगाला एकत्र करणारे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत, असेही गौरवोद्गार त्यांनी पंतप्रधानांबद्दल काढले. दरम्यान, काही लोकांची मागणी आहे की भारतरत्नही मिळावा, मात्र ही लोकांची भावना आहे आणि तो सरकारचा अधिकार आहे, असेही ते म्हणाले.
ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना महाराष्ट्र सरकारचा सर्वोच्च नागरी पुरस्कार महाराष्ट्र भूषण जाहीर झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तशी घोषणा विधानसभेत केली. यानंतर राम सुतार यांच्यावर सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला. या पार्श्वभूमीवर शिल्पकार राम सुतार आणि त्यांचे पुत्र शिल्पकार अनिल सुतार यांनी ‘पुढारी’शी संवाद साधला. यावेळी बोलताना राम सुतार यांनी राज्य शासनासह मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे आभार व्यक्त केले. पंतप्रधान मोदींचेही त्यांनी कौतुक केले. आजवर महाराष्ट्रसह देशात आणि जगाच्या पाठीवर जे काम करू शकलो त्या कामाचा हा सन्मान आहे, मी कृतज्ञ आहे आणि हा अत्यंत आनंदाचा क्षण आहे, अशी भावुक प्रतिक्रिया त्यांनी दिली.
राम सुतारांचे पुत्र अनिल सुतार म्हणाले की, अलीकडेच माझ्या वडिलांनी शंभरी पूर्ण केली आहे. त्यांच्या कामालाही ७५ वर्ष पुर्ण झाली. महाराष्ट्रात मुंबईत इंदू मिलमध्ये बसवला जाणारा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा, पुण्यात होऊ घातलेला छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा, अरबी समुद्रातील स्मारकात बसवला जाणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अशी कामे वडीलांच्या मार्गदर्शनात सुरू आहेत. यापूर्वी संसदेत असलेले वेगवेगळे पुतळे, राष्ट्रपती भवनातील पुतळे आणि जगातील सर्वात उंच पुतळा असलेला ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ असे अनेक पुतळे माझ्या वडिलांनी बनवले आहेत. जगाच्या पाठीवर ४५० पेक्षा जास्त शहरांमध्ये महात्मा गांधींचे जे पुतळे आहेत ते माझ्या वडीलांनी बनवलेले आहेत. महाराष्ट्र राज्यातील नेते आणि सर्वच घटकांना माझ्या वडिलांचा, त्यांच्या कामाचा आदर आहे. अनेक दिग्गजांना आजवर महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला. लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर या दिग्गजांच्या श्रेणीत माझ्या वडिलांचा सन्मान राज्य शासनाने केला, याबद्दल आनंद वाटतो, अशा भावना अनिल सुतार यांनी व्यक्त केल्या.
१०० वर्ष वय असलेले राम सुतार यांना जेव्हा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला तेव्हा ते आपल्या नोयडा येथील स्टुडीओमध्ये बसून कामात मग्न होते. आपल्या सहकाऱ्यांना ते वेगवेगळ्या गोष्टींच्या संदर्भाने सूचना देत होते. वृत्तवाहिन्यांवर झळकलेल्या बातम्यांमुळे आणि नातेवाईक, मित्रपरिवार यांच्या शुभेच्छांनी त्यांना या पुरस्काराबद्दल कळाले. नंतर विविध मंत्री आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गजांनी फोन करून त्यांचे अभिनंदन केले.
मुळचे धुळे जिल्ह्यातील असलेले राम सुतार यांनी मुंबईच्या जे. जे. स्कूल ऑफ आर्ट मधून शिक्षण घेतले. त्यांच्या प्रतिभेमुळे त्यांना थेट द्वितीय वर्षाला प्रवेश मिळाला आणि ५ वर्षांची पदवी त्यांना ४ वर्षात मिळाली. शालेय जीवनापासून त्यांना मुर्ती तयार करणे, पुतळे बनवणे, त्यांची चित्र काढून बघणे या कामांमध्ये आवड होती. देशाची संसद, राष्ट्रपती भवन अशा प्रतिष्ठित संस्थांसह देश आणि जगाच्या पाठीवर अनेक महत्त्वाच्या ठिकाणी राम सुतार यांनी पुतळे उभारले आहेत. त्यांनी बनवलेला महात्मा गांधींचा पुतळा जगाच्या पाठीवर ४०० पेक्षा अधिक शहरांमध्ये आहे. त्यांच्या या कामासाठी त्यांना यापूर्वी पद्मश्री, आणि पद्मभूषण हे पुरस्कार देखील मिळालेले आहेत.