महाकुंभमेळ्यासाठी गंगा यमुनेच्या तिरावर उभारलेले तंबूंचे शहर Image Source X
महाकुंभ मेळा

४००० हेक्‍टरवर उभारले शहर : २७०० एआय कॅमेऱ्यांसोबत, अंडरवॉटर ड्रोनची नजर !

Maha Kumbh Mela 2025| जगातील सर्वोच भक्तीचा संगम, आकडेवारीही अचंबित करणारी

Namdev Gharal

पुढारी ऑनलाईन डेस्क :

कोट्यवधी भाविकांना प्रवित्र स्नानाचे पुण्य देणारा महाकुंभ मेळा सोमवार १३ जानेवारी रोजी सुरु झाला आहे. उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे होणार्‍या या महाकुंभसाठी देशविदेशातून भाविक हजेरी लावणार आहेत. गंगा- यमुना या दृश्य व सरस्वती या अदृश्य नद्यांच्या संगमावर याचे आयोजन केले आहे. याबाबतेच सविस्‍तर वृत्त सीएनएन यांनी दिले आहे.

जवळपास चाळीस कोटीहून अधिक भाविक या महाकुंभमेळ्यास हजेरी लावतील असा अंदाज प्रशासनाने वर्तवला आहे. इतक्‍या मोठ्या प्रमाणात जमणाऱ्या भाविकांच्या गर्दीचे नियोजन करणे तितकेच कठीण काम आहे. गेले वर्षभर या सोहळ्यासाठी प्रशासनाने तयारी केली आहे. यासाठीची केलेली ही तयारीही अंचबित करणारी आहे. २७०० एआय संचलित कॅमेरे, अंडरवॉटर ड्रोन यासह आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यासाठी केला जाणार आहे.

सुरक्षेसाठी राहणार 2700 एआय कॅमेर्‍यांची नजर

2013 मध्ये झालेल्या कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीत अनेक लोक मारले गेले होते. अशी दुर्घटना पुन्हा घडू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून 2700 कॅमेरे बसवले आहेत. हे कॅमेरे हाताळण्यासाठी शेकडो एर्क्पट अभियंते याचे ऑपरेटींग करणार आहेत. कुठेही गर्दी झाली किंवा चेंगराचेंगरी झाली की तत्काळ आपत्ती दलांना अलर्ट केले जाणार आहे. तसेच सुरक्षेची जबाबदार 1000 पोलिस अधिकारी पाहतील. चेकपॉईंटवर प्रत्येक वाहनाची कसून तपासणी केली जाणार आहे.

अंडर वॉटर ड्रोनचा पहिल्यांदाच वापर

प्रचंड मोठ्या गर्दीवर नजर ठेवण्यासाठी ड्रोनचीही मदत घेतली जाणार आहे. अवकाशात फिरणारे ड्रोन नजर ठेवतीलच पण पाण्यातही काही दुर्घटना घडू नये म्हणून अडंरवॉटर ड्रोनही उपयोगात आणले जाणार आहेत. हे ड्रोन 100 मिटर खोलपर्यंत गोता मारु शकतात व आपल्या चारही बाजूला नजर ठेवू शकतात. यामुळे पाण्यात होणारी दुर्घटनाही टाळता येणार आहे.

4000 हजार हेक्टर जमिनीवर उभारले शहर

या महाकुंभ मेळयाची तयारी गेले वर्षभर सुरु होती. प्रयागराज शहराची लोकसंख्या 60 लाख आहे. पण सोहळ्यासाठी 40 कोटी भाविक येणार म्हणून गंगा यमुनेच्या दोन्ही तिरांवर 4000 हेक्टर जमिनीवर एक शहर वसवले आहे. यामध्ये 1,60,000 तंबू उभारले आहेत. तर 1,50,000 हजार शौचालयांची उभारणी करण्यात आली आहे. तर पिण्याच्या पाण्यासाठी 1249 किलोमिटर इतक्या लांबीची पाईपलाईन टाकली आहे.

16 हजार ट्रेनच्या फेर्‍या तर 7000 बसेस

या महाकुंभसाठी येणार्‍या भाविकांच्या सोईसाठी केंद्र सरकारने टे्रनची विशेष व्यवस्था केली आहे.यासाठी सव्वा महिन्यात 13100 साध्या रेल्वेच्या फेर्‍या होतील तर 3000 विशेष रेल्वेची सोय केली आहे. देशभरातून ७००० बसेस ये- जा करणार आहेत. या बसेससाठी 7 नव्या बसस्टॉपची सोय केली आहे. दोन्ही तिरांवर ये - जा करण्याठी 30 तरंगते पूल बांधले आहेत.

देशातील चार शहरात पडले अमृताचे थेंब !

कुंभमेळ्यापाठीमागील हिंदू आख्यायिका अशी आहे की, देव- दैत्यांनी जेंव्हा सागर मंथन केले तेव्हा सर्वात शेवटी अमृत हे रत्न बाहेर आले. अर्मत्य होण्यासाठी महत्वाचे असणारे हे अमृत मिळवण्यासाठी देव - दैत्यांमध्ये लढाई झाली या गदारोळात अमृतकुंभामधून पृथ्वीवर चार ठिकाणी चार थेंब पडले. यामध्ये प्रयागराज, नाशिक, हरिद्वार व उज्जैन या शहरात हे थेंब पडले.या चार शहरात हा कुंभमेळा आलटून - पालटून दर तीन वर्षांनी भरतो.

देशभरातील साधूंची उपस्थिती

या कुंभमेळ्यात देशभरातून साधू उपस्थित राहतात. यामध्ये नागा साधूंची विषेश उपस्थिती असते. अंगाला फासलेली राख, गळ्यात रुद्राक्ष माळा, मुखी देवाचे नाव व एकामागून एक जाणारे जथ्थेच्या जथ्थे हे पाहणे म्हणजे एक अवर्णनिय सोहळा असतो. मंळवारी सकाळी नागा साधूंनी संगमावर पवित्र डूबकी मारुन या सोहळ्याची सुरवात केली. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगभरातील लोकांना या सोहळ्यात उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. या सोहळ्यासाठी हॉलिवूड आणि बॉलिवूडमधील कलाकारांची उपस्थिती आकर्षणाचा केंद्रबिंदू राहणार आहे.

अलाहबादचे झाले प्रयागराज

सध्या होत असणारा महाकुंभमेळा प्रयागराज या शहरात होत आहे. पुर्वी या शहराचे नाव अलाहाबाद असे होते. योगी आदित्यनाथ यांनी या शहराचे असणारे धार्मिक महत्व ओळखून या शहराचे नामांतर प्रयागराज असे केले. हिंदू भाविकांचे पवित्र शहर अशी या शहराची ओळख बनली आहे. मुघल बादशाह अकबर याने अलहाबाद हे शहर 1583 मध्ये वसवले. सुरवातील याचे नाव इलाहबाद असे होते. नंतर त्याचे पहिले अक्षर बदलले व त्याचे नाव अलाहबाद असे केले. त्याचा अर्थ अल्लाचे शहर असा होतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT