प्रयागराज : पौष पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर मकर संक्रांतीनिमित्त गंगा, यमुना आणि त्रिवेणी संगमावर पवित्र स्नान करण्यासाठी कोट्यवधी भाविकांंचा जनसागर उसळला होता. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारने हे छायाचित्र सोशल मीडियावरून प्रसारित केले आहे.  Pudhari File Photo
राष्ट्रीय

Mahakumbh Mela | 13 आखाड्यांतील साधूंनी साधली अमृत स्नानाची पर्वणी

हरहर महादेव, जय श्रीरामच्या घोषणांनी निनादला संगम; देश-विदेशातील भाविक उपस्थित

पुढारी वृत्तसेवा

प्रयागराज : महाकुंभाच्या (Mahakumbh Mela) पर्वणीचा मंगळवारी दुसरा दिवस आणि शाही अर्थात अमृत स्नानाचा पहिला दिवस. 13 प्रमुख आखाड्यांतील साधू-संतांसह देश-विदेशातील भाविकांनी श्रद्धापूर्वक शाही स्नानाची अनुभूती घेतली. गंगा, यमुना आणि सरस्वती (गुप्त) च्या पवित्र संगमावरील घाट हरहर महादेव आणि जय श्रीरामांच्या घोषणांनी दणाणून गेला.

दरम्यान, नागा साधू-संतांनी पवित्र स्नानाआधी युद्धकलेचे प्रदर्शन केले. 13 आखाड्यांतील साधू-संतांनी पौष पौर्णिमेरोजी क्रमाक्रमाने संगमामध्ये पवित्र डुबकी घेतली. देश-विदेशातील भाविकांनी गंगा स्नानाची अनुभूती घेतली. प्रयागराजमध्ये शिस्तबद्ध आणि शांततेने अमृत स्नानाचा सोहळा पार पडला. श्रीपंचायती आखाडा महानिर्वाणीच्या साधू-संतांनी सर्वाधिक आधी अमृत स्नान केले. त्यानंतर अन्य आखाड्यांतील साधूंनी स्नान केले.

गर्दीत 4,500 जण हरवले; पोलिसांकडून शोध मोहीम जारी

मकर संक्रांतीदिनीच्या शाही स्नानावेळी त्रिवेणी संगमावर भाविकांच्या गर्दीचा जनसागर उसळला होता. पहाटेपासून नऊपर्यंत गर्दीमुळे 4,500 लोक बेपत्ता झाले आहेत. खोया-पाया केेंद्रातून त्यांना शोधण्याचे काम सुरू आहे. 500 मीटरचे अंतर कापण्यासाठी 5 तासांचा अवधी लागत आहे. प्रचंड गर्दी झाल्याने अनेक भाविक बेपत्ता होत आहेत. ध्वनिक्षेपकावरून हरवलेल्यांचा शोध घेण्यात येत आहे. आपल्या कुटुंबीयांपासून गर्दीत हरवलेल्यांना शोधण्यासाठी खास पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. हरवलेल्यांपैकी काही जण सापडले असून त्यांना त्यांच्या कुटुंबीयांच्या हवाली करण्यात आले आहे. हरवलेल्यांना शोधण्यासाठी हेल्पलाईन क्रमांक 1920 ची व्यवस्था करण्यात आली आहे. गर्दीत हरवलेल्या महिला आणि बालकांसाठी खास छावणी उभारण्यात आली आहे. स्पीकरवरून निवेदनासह मोबाईल आणि सोशल मीडियाच्या मदतीने गर्दीत बेपत्ता झालेल्यांचा शोध घेण्यात येत आहे.

हठयोगी बाबा जटा, नखे का राखतात?

महाकुंभ मेळ्यात साधारण 13 आखाड्यांतील साधू-संत भाग घेतात. यामध्ये प्रामुख्याने नागा साधू, अघोरी साधू आणि हठयोगी साधूंचा प्रामुख्याने समावेश असतो. हठयोगी साधू केस आणि हाता-पायाची नखे कधीच काढत नाहीत. महाकुंभात सर्वात आधी नागा साधूंना स्नान करण्याची अनुमती देण्यात येते. त्यानंतर अन्य आखाड्यांतील साधू-संत आणि भाविक त्रिवेणी संगमात डुबकी लगावतात. हठयोगी साधू अनेक वर्षांपासून जप-तप अर्थात तपश्चर्या करीत असतात. विशेष योग मुद्रेत ते ध्यानस्थ होतात. हठयोगी बाबांच्या तपश्चर्येचे नियम खूप अवघड असतात. हठयोगी बाबा भगवान शंकराचे उपासक अर्थात भक्त असतात. भगवान शिवांच्या जटांसारखे या बाबांच्या केसांचे जटांमध्ये परिवर्तन होते. या जटा भगवान शंकरांच्या प्रतीक मानल्या जातात. जटा काढल्यास भगवान शंकरांचा अवमान मानला जातो. महाकुंभ मेळ्यात हठयोगी बाबा स्नान करताना जटा भिजवतात. त्यावेळी त्यांना दिव्यशक्तीचा साक्षात्कार होतो, अशी हठयोगी बाबांची धारणा असते. शरीरावरील मोह सोडण्यासाठी हठयोगी बाबा नखेसुद्धा काढत नाहीत. काही बाबा आयुष्यभर नखे न कापण्याचे व्रत घेतात. शरीराच्या नीटनेटकेपणाकडे हठयोगी बाबा जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात. हठयोगीबाबा महाकुंभ मेळ्यात आपला हठ दाखविण्यासाठी येत नाहीत. भगवान शंकरांचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी ते पवित्र संगमात डुबकी घेण्यासाठी येतात.

ग्लॅमरस हर्षा बनली साध्वी!

ग्लॅमरसची चंदेरी दुनिया सोडून हर्षा रिछारिया यांनी साध्वी बनून व्रतस्थ आयुष्य जगण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. आचार्य महामंडलेश्वर स्वामी श्री कैलाशानंदगिरी यांच्या त्या शिष्या बनल्या आहेत. कैलाशानंदगिरी यांनी त्यांना दीक्षा दिली आहे. आपण केवळ शिष्या नसून महाराजांच्या भक्त आणि अनुयायी असल्याची प्रतिक्रिया त्यांनी माध्यमांना दिली. गेल्या दोन वर्षांपासून साध्वी झाल्याचे त्यांनी सांगितले. सोशल मीडियावर मात्र हर्षा यांनी दोन महिन्यांपूर्वी बँकाँक येथील शोमध्ये भाग घेतल्याचा दावा करण्यात आला आहे.

लॉरेन पॉवेल आजारी; अ‍ॅलर्जीचा त्रास

स्वामी कैलाशानंदगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली महाकुंभ मेळ्यात दाखल झालेल्या अ‍ॅपलचे सहसंस्थापक स्टीव्ह जॉब्ज यांच्या पत्नी लॉरेन पॉवेल या आजारी पडल्या आहेत. गर्दीमुळे त्यांना अ‍ॅलर्जीचा आणि प्रतिकूल वातावरणाचा त्रास जाणवू लागला आहे. त्यामुळे त्यांनी आज संगमात डुबकी घेतली नाही. त्या सध्या गिरी महाराज यांच्या आश्रमात आहेत. सध्या त्या विश्रांती घेत असून तब्येत ठीक झाल्यावर त्या पवित्र स्नान करणार असल्याची माहिती गिरी महाराज यांनी दिली.

कुंभ मेळ्याचे चिनी कनेक्शन

भारतातील कुंभ मेळा आणि चिनी कनेक्शनबाबत भाविकांमध्ये उत्सुकता आहे. विशेष करून प्रयागराज येथील महाकुंभ मेळ्याचे चीनसोबत अधिक कनेक्शन आहे. सातव्या शतकामध्ये चिनी बौध भिख्खू ह्येनसांग हे भारत यात्रेवर निघाले होते. भारतात अनेक वर्षे वास्तव्य करून त्यांनी बौद्ध धर्माचा अभ्यास केला. भारतातील विविध भागांमध्येही त्यांनी भ्रमंती केली. यादरम्यान, त्यांनी तत्कालीन प्रयागमधील महाकुंभ मेळ्यातही भाग घेतला होता. चीनला परत गेल्यानंतर त्यांनी महाकुंभ मेळ्याचा वृत्तांत लिहून ठेवला होता. भारतातील महाकुंभ मेळ्यास पवित्र स्नानासाठी लाखो लोकांची उपस्थिती आणि जगातील सर्वात मोठ्या धार्मिक अनुष्ठानाविषयी त्यांनी सविस्तर वृत्तांत दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT