प्रयागराज : जगातील सर्वात मोठा धार्मिक महोत्सव आणि सनातनच्या भव्य महाकुंभ मेळ्यास प्रयागराजमध्ये प्रारंभ झाला आहे. देशातील सर्व आखाड्यातील साधू महंत गंगा, युमना, सरस्वतीच्या त्रिवेणी संगमामध्ये डुबकी घेण्यासाठी दाखल झाले आहे. देश-विदेशातील भाविकही या ठिकाणी दाखल झाले असून पवित्र स्नानांची छायाचित्रे ते आपल्या मोबाईलच्या कॅमेर्यात कैद करीत आहेत. या शिवाय जगातील 183 देशातील भाविकही 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या महाकुंभ मेळ्यात पवित्र स्नानासाठी हजेरी लावणार आहेत. यामुळे पुढील 45 दिवस प्रयागराजला धार्मिक राजधानीचे स्वरूप प्राप्त होणार आहे.
महाकुंभात एकूण सहा स्नान होणार आहेत. यामध्ये तीन शाही (अमृत)स्नानांचा समावेश असणार आहे. अखाड्यातील साधू शाही स्नान करतात. पहिले शाही स्नान मकर संक्रातीदिनी (14 जानेवारी) होणार आहे. दुसरे शाही स्नान मौनी अमावस्येला 19 जानेवारी तर तिसरे शाही स्नान वसंत पंचमीला 3 फेब्रुवारी रोजी होणार आहे.
विष्णुपुराणननुसार 144 वर्षानंतर प्रथमच समुद्रमंथनाच्या राशीचा योग येत आहे. सूर्य आणि चंद्र मकर राशीत आणि गुरू ग्रहाने मेष राशीत प्रवेश केल्यावर महाकुंभचा योग येतो. सूर्य, चंद्र, शनि आणि गुरू या चारही ग्रहांची शुभ स्थिती बनते. हा संयोग समुद्रमंथनावेळी आला होता. समुद्रमंथनावेळी देव आणि दानवातील युद्धावेळी असा ग्रहयोग जुळून आल्याचे मानले जाते.
राम बाहुबली दास अर्थात बाहुबली बाबा पंजाबमधून सायकलने प्रवास करीत महाकुंभ मेळ्यात आले आहेत. जलवायूविषयी जनजागृती करीत ठिकठिकाणी वृक्षारोपण करीत ते आले आहेत.
महाकुंभ मेळ्यात त्रिवेणी संगमामध्ये स्नान करण्यासाठी भाविकांना 10 किमी अंतरावरून पायी चालत यावे लागणार आहे. डुबकीसाठी भाविकांची झुंबड उडाली आहे. त्यामुळे खबरदारीसाठी संगमापासून 10 किमी अंतरावर बॅरिकेड्स लावण्यात आली आहे. गर्दीमुळे चेंगराचेंगरी होऊ नये, यासाठी प्रशासनाने व्यवस्था केली आहे.
महाकुंभ मेळ्यासाठी परिचितांपैकी कोणी गेले असल्यास त्यांना संगमातील पाणी आणण्यास सांगू शकता. काही स्वयंसेवी संघटनांनी पवित्र संगमातून पाणी आणि प्रसाद पाठविण्याचीही व्यवस्था केली आहे. यापैकी काहीच व्यवस्था न झाल्यास शाही स्नानादिवळी नदीच्या पाण्याने आपण घरी स्नान करू शकता. यामुळे पापमुक्ती मिळू शकते, असा दावा पुराणामध्ये करण्यात आला आहे.
तिथी पौष पोर्णिमा : 13 जानेवारी
मकर संक्रात : 14 जानेवारी
मौनी अमावस्या : 29 जानेवारी
वसंत पंचमी : 3 फेब्रुवारी
माघी पोर्णिमा : 12 फेब्रुवारी
महाशिवरात्र : 26 फेब्रुवारी