छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल.  File Photo
राष्ट्रीय

ऑनलाईन बेटिंग घोटाळा प्रकरण : भूपेश बघेल यांच्याविरुद्ध 'सीबीआय'ची मोठी कारवाई

Mahadev betting app case : ६००० कोटींच्‍या घोटाळाप्रकरणी बघेल आरोपी क्रमांक सहा

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : ६००० कोटी रुपयांच्या महादेव ॲप ऑनलाईन बेटिंग घोटाळा प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. बघेल यांच्या निवासस्थानी सीबीआय पथकाने नुकताच छापा टाकला होता. ( Mahadev betting app case)

सीबीआयने दाखल केलेल्या एफआयआरमध्ये माजी मुख्यमंत्री बघेल यांना आरोपी क्रमांक ६ बनवण्यात आले आहे. सीबीआयने महादेव सत्ता ॲपचे प्रवर्तक सौरभ चंद्राकर आणि रवी उप्पल, महादेव ॲपचे प्रवर्तक रवी उप्पल, सौरभ चंद्राकर, आशिम दास, सतीश चंद्राकर, चंद्रभूषण वर्मा, भीम सिंह यांच्‍यासह २१ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

सीबीआयने भूपेश बघेल यांच्या घरावर टाकला होता छापा

मार्च महिन्यात सीबीआयने छत्तीसगडमध्ये मोठी कारवाई केली होती. सीबीआयने देशभरातील भूपेश बघेलसह सर्व आरोपींच्या ६० ठिकाणी छापे टाकले होते. महादेव सत्ता अॅप प्रकरणात, छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्याव्यतिरिक्त, सीबीआयने भिलाईचे आमदार देवेंद्र यादव, अनेक राजकारणी, नोकरशहा आणि पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई केली होती. या प्रकरणी सीबीआयने १८ डिसेंबर २०२४ रोजी गुन्‍हा दाखल केला होता. या कारवाईनंतर राज्यातील राजकारण तापले आहे.

भूपेश बघेल यांच्यावर काय आरोप आहे?

महादेव सत्ता ॲपचे प्रवर्तक सौरभ चंद्राकर आहेत. ते भिलाई, दुर्ग येथील रहिवासी आहेत. सौरभ चंद्राकर सध्या दुबईत आहेत. भूपेश बघेल यांच्या कार्यकाळात महादेव सत्ता अ‍ॅपला संरक्षण देण्यात आल्याचा आरोप आहे. त्या बदल्यात तत्कालीन मुख्यमंत्र्यांना ५०८ कोटी रुपयांचे संरक्षण पैसे देण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. दरम्‍यान, भूपेश बघेल यांनी हा दावा फेटाळून लावत आपली प्रतिमा खराब करण्‍यासाठी राजकीय आकसातून आपल्‍यावर आरोप करण्‍यात येत असल्‍याचे म्‍हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT