प्रयागराज : पुढारी ऑनलाईन
प्रयागराजच्या जमिनीवर गेल्या १३ जानेवारीपासून महाकुंभ २०२५ सुरू आहे. या महाकुंभाने आतापर्यंत अनेक इतिहास रचले आहेत. या विराट महाकुंभाचा अंदाज या गोष्टीतूनच येतो की, या ठिकाणी येणाऱ्या भाविकांची संख्या ही काही देशांच्या लोकसंख्येहून अधिक आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारच्या प्रयत्नांनी इथल्या परंपरा आणि दिव्यतेने सगळ्या जगाला मंत्रमुग्ध केले.
महाकुंभात सहभागी होउन पवित्र स्नान केलेल्या भाविकांची संख्या ही आतापर्यंत ५० कोटींच्या पुढे पोहोचली आहे. अमेरिका, इंडोनेशिया, पाकिस्तान, नायजेरिया, ब्राजिल, रशिया आणि मेक्सिकोची लोकसंख्याही यापेक्षा मागे आहे.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी असा अंदाज वर्तवला होता की, यंदाच्या कुंभमेळ्यात सहभागी होणाऱ्या लोकांची संख्या ही सर्व रेकॉर्ड मोडेल. सुरूवातीलाच ४५ कोटी भाविक येण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. त्यांचा तो अंदाज ११ फेब्रुवारीलाच खरा ठरला. तर शुक्रवारी १४ फेब्रुवारी रोजी ही संख्या ५० कोटींच्या पुढे पोहोचली. आता महाकुंभमध्ये १२ दिवस आणि आणखीन एक महत्वपूर्ण स्नान बाकी आहे. स्नान करणाऱ्या भाविकांची संख्या ५५ ते ६० कोटींच्या वर पोहोचण्याचा अंदाज आहे.
आतापर्यंत भाविकांच्या संख्येचा विचार केल्यास सर्वाधिक ८ कोटी भाविकांनी मौनी अमावस्येच्या दिवशी स्नान केले. तर ३.५ कोटी भाविकांनी मकर संक्रांतीच्या दिवशी अमृत स्नान केले. एक फेब्रुवारी आणि ३० जानेवारी या दोन दिवसात २-२ कोटींच्या पार भाविकांचा आकडा पोहोचला. पौष पौर्णिमेला १.७ कोटी भाविकांनी संगमात श्रद्धेची डुबकी घेतली. या शिवाय वसंत पंचमी दिवशी २.५७ कोटी भाविकांनी त्रिवेणी संगमात पवित्र स्नानाचा पर्वणी साधली. माघी पौर्णिमेच्या महत्वाच्या स्नान पर्वातही २ कोटींहून अधिक भाविकांनी संगमात पवित्र स्नानाचा आनंद घेतला.