राष्ट्रीय

Diwali Tragedy : जीवघेणी मस्करी! मित्राने रसगुल्ला सांगून खाऊ घातला 'गावठी बॉम्ब'; तोंडातच स्फोट होऊन तरुणाचा करुण अंत

जुने वैर नसतानाही घडला अमानुष प्रकार; दोन गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल, दोन्ही आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

पुढारी वृत्तसेवा

डिंडौरी (मध्य प्रदेश) : मैत्रीच्या नात्याला काळिमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक आणि अमानुष घटना मध्य प्रदेशातील डिंडौरी जिल्ह्यात उघडकीस आली आहे. एका ३५ वर्षीय तरुणाला त्याच्याच शेजारी राहणाऱ्या मित्राने दिवाळीचा गोडवा म्हणून रसगुल्ला खाऊ घातला. मात्र, तो पदार्थ तोंडात टाकून चावताच कानठळ्या बसवणारा मोठा स्फोट झाला. या भीषण दुर्घटनेत गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा रुग्णालयात उपचारादरम्यान करुण अंत झाला.

पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, मयत तरुणाचे नाव राजेंद्र बरौतिया (वय ३५) असे आहे. रानडुकरांची शिकार करण्यासाठी वापरला जाणारा गावठी बॉम्ब रसगुल्ला असल्याचे भासवून त्यांचा मित्र रामभगत सिंह बरौतिया याने त्यांना खाऊ घातला होता. मंगळवारी (दि. १० नोव्हेंबर) सायंकाळी डिंडौरीच्या कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पडरिया छांटा गावात ही हृदयद्रावक घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी रामभगत आणि त्याला हा बॉम्ब पुरवणाऱ्या अन्य एका व्यक्तीला अटक केली आहे.

कोतवाली पोलिस ठाण्याचे प्रभारी दुर्गा प्रसाद नागपुरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी राजेंद्र बरौतिया आपल्या घराच्या अंगणात पत्नी, लहान मूल आणि आजीसह शेकोटीजवळ बसले होते. त्याच वेळी शेजारी राहणारा रामभगत सिंह तेथे आला. शेकोटीजवळ गप्पा आणि थट्टा-मस्करी सुरू असतानाच रामभगतने राजेंद्र यांच्या हातात लहान चेंडूच्या आकाराची एक वस्तू दिली आणि दिवाळीचा उल्लेख करत हा रसगुल्ला खाऊन पाहण्यास सांगितले.

राजेंद्र यांची पत्नी सुशीला बाई यांनी या थरारक प्रसंगाची माहिती देताना सांगितले की, पतीने तो पदार्थ तोंडात टाकून चावताच क्षणात मोठा स्फोट झाला. या स्फोटात राजेंद्र यांचा जबडा पूर्णपणे फाटला आणि अवघ्या एका सेकंदात त्यांचा चेहरा ओळखू न येण्याइतका छिन्नविच्छिन्न झाला. कुटुंबीयांनी तातडीने त्यांना रिक्षातून डिंडौरी जिल्हा रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. राजेंद्र यांच्या पश्चात पत्नी सुशीला आणि एक लहान मूल असा परिवार आहे.

या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या दुसऱ्या आरोपीला हा स्फोटक पदार्थ जंगलात सापडला होता, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. त्याने तो बॉम्ब रामभगत सिंहकडे दिला आणि रामभगतने तोच बॉम्ब राजेंद्र यांना रसगुल्ला असल्याचे सांगून खाऊ घातला. हा स्फोटक पदार्थ जंगलात कोठून आला आणि तो तेथे कोणी ठेवला होता, याचा सखोल तपास पोलिस करत आहेत.

प्राथमिक तपासात दोन्ही आरोपी आणि मृत राजेंद्र यांच्यात कोणतेही जुने वैर किंवा वाद असल्याचे समोर आलेले नाही. तरीही या गंभीर कृत्याबद्दल पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम १०५ तसेच स्फोटक पदार्थ अधिनियमाच्या कलम ३ आणि ४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. यासोबतच घटनास्थळावरून स्फोटकांचे अवशेष आणि नमुने गोळा करण्यात आले असून, ते तपासणीसाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेत (FSL) पाठवले जाणार आहेत.

दरम्यान, मध्य भारतातील ग्रामीण भागांत रानडुकरांची शिकार करण्यासाठी अशा 'पिग बॉम्ब'चा वापर केला जातो. इंदूर येथील स्फोटक तज्ज्ञ शरद सरवटे यांनी सांगितले की, अशा बॉम्बमध्ये प्रामुख्याने अमोनियम नायट्रेट आणि नायट्रेट जेलीसारख्या रसायनांचा वापर केला जातो. दिवाळीतील सुतळी बॉम्बइतका आकार असलेल्या या जेलीसारख्या पदार्थावर दाब पडताच वेगाने वायू तयार होऊन स्फोट होतो. वन्यप्राण्यांचे उर्वरित शरीर सुरक्षित राहावे यासाठी यात कमी तीव्रतेचा स्फोट घडवून आणला जातो, परंतु तोंडात चावल्यास संबंधित अवयवाची मोठ्या प्रमाणात हानी होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT