नवी दिल्ली : कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी इथल्या महादेवी उर्फ माधुरी हत्ती प्रकरणी आज (दि.१२) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. परंतु, हत्तीणीला कोल्हापुरात परत पाठवण्यासंदर्भात तुर्त कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. हे प्रकरण उच्चस्तरीय कमिटीकडे पाठवण्यावर आज सर्वोच्च न्यायालयात एकमत झाले.
राज्य सरकारच्या वकीलांनी आज सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडताना म्हटले आहे की, 'हा हत्ती कोल्हापूरवरून वनताराकडे पाठवला आहे. तो कोल्हापूरला परत पाठवावा, असा युक्तीवाद राज्य सरकारच्या वकीलांनी केला. यावर हत्तीची तब्बेत खूप खराब असल्याची कोर्टाने टिप्पणी करत आम्ही वनतारा बरोबर बोलू असे म्हटले. यानंतर हायपॉवर कमिटीकडे हे प्रकरण दिल्याचे राज्य सरकार वकीलांनी म्हटले. यावर कोर्टाने हायपॉवर कमिटी काय आहे, असा सवाल कोर्टाने विचारला.
हा हत्ती कोल्हापूर वरून वनताराकडे पाठवला आहे. लोकांच्या भावनावणी आहे की तो हत्त्ती परत कोल्हापूरला पाठवावा, तुम्ही कोर्टाच्या निर्णयापेक्षा लोकांच्या भावना पाहत आहात ? असा सवाल देखील कोर्टाने राज्य सरकारच्या वकीलांना सुनावणीवेळी केला आहे. दरम्यान आज सर्वोच्च न्यायालयात माधुरी हत्तीण परत पाठवण्याचा कुठलाही निर्णय झाला नाही. तसेच हे प्रकरण एका उच्चस्तरीय कमितिकडे पाठवलं जाईल, असे सगळ्या पक्षकारांचं आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणीवेळी एकमत झाले.
कोल्हापूरच्या नांदणी येथील जैन मठात ३३ वर्षांपासून असलेली हत्तीण माधुरी उर्फ महादेवी याबाबतचा वाद “माधुरी हत्ती प्रकरण” म्हणून ओळखला जातो. मठ व नागरिकांचा धार्मिक भावनेतून तिला वनतारामधून कोल्हापूरला परत आणण्याचा आग्रह आहे. तर न्यायालय व प्राणीसंवर्धन संस्था हिच्या आरोग्य व कल्याणाला प्राधान्य देत आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तिला जामनगरच्या “वनतारा” पुनर्वसन केंद्रात हलवण्यात आले असून, या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल आहे. त्यामुळे धार्मिक भावना, जनआंदोलन आणि प्राणीसंवर्धन कायदे अशा तिघांच्या कचाट्यात हे प्रकरण अडकल्याने राज्यभर चर्चेत आहे.