पुढारी ऑनलाईन डेस्क : लक्झेंबर्गचे राजकुमार रॉबर्ट यांचे पुत्र राजकुमार फ्रेडरिक यांचे वयाच्या २२ व्या वर्षी अनुवांशिक विकारामुळे निधन झाले. त्यांना जन्मतःच पीओएलजी मायटोकॉन्ड्रियल रोग हा दुर्मिळ आजार झाला होता. या आजारात शरीराच्या पेशींना ऊर्जा मिळत नाही, ज्यामुळे शरीराचे वेगवेगळे अवयव हळूहळू काम करणे थांबवतात आणि शेवटी व्यक्तीचा मृत्यू होतो.
प्रिन्स फ्रेडरिक यांना वयाच्या १४ व्या वर्षी या आजाराचे निदान झाले होते. लक्षणे स्पष्टपणे दिसू लागल्यानंतर रोगाचे परिणाम वेगाने वाढू लागले. हा आजार मेंदू, मज्जासंस्था, यकृत, स्नायू, डोळे इत्यादी अनेक अवयवांना प्रभावित करतो. या आजारावर कोणताही उपचार नाही आणि त्याचे निदान करणे देखील खूप कठीण आहे. प्रिन्स फ्रेडरिक यांच्या कुटुंबाने फ्रान्स, ब्रिटन आणि अमेरिका सारख्या देशांमधील तज्ञांकडून उपचार करून घेतले होते. मात्र, त्याची प्रकृती सुधारली नाही. त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी आणि वैद्यकीय पथकाने खूप प्रयत्न केले, परंतु तो या आजारातून वाचू शकला नाही.