नवी दिल्ली : लखनऊच्या एका न्यायालयाने काँग्रेस नेते राहुल गांधी यांना २०० रुपयांचा दंड ठोठावला आहे. सुनावणीला सतत गैरहजर राहिल्याने अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी (एसीजेएम) न्यायालयाने हा दंड ठोठावला आहे. तसेच १४ एप्रिल २०२५ ला न्यायालयात हजर राहावे, असे सुनावत जर ते या तारखेलाही हजर राहिले नाहीत तर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा न्यायालयाने दिला आहे.
तक्रारदार नृपेंद्र पांडे यांच्या म्हणण्यानुसार, राहुल गांधी यांनी १७ डिसेंबर २०२२ रोजी महाराष्ट्रातील अकोला येथे आयोजित पत्रकार परिषदेत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले होते. त्यांनी सावरकरांना 'ब्रिटिशांचे सेवक' आणि 'पेन्शनर' म्हटले होते. याचिकाकर्त्यांच्या मते राहुल गांधी यांनी हे विधान समाजात तेढ आणि द्वेष पसरवण्याच्या उद्देशाने केले होते. या निवेदनाबाबत भारतीय दंड संहितेच्या कलम १५३ (अ) आणि ५०५ अन्वये गुन्हा नोंदविण्याची मागणी करण्यात आली.