पुढारी ऑनलाईन डेस्क : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. पाचव्या टप्प्यात ८ राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील ४९ लोकसभा मतदारसंघात मतदान होत आहे. सकाळी ११ वाजेपर्यंत मिळालेल्या आकडेवारीनुसार, देशात एकूण २३.६६ टक्के मतदान झाले आहे. यामध्ये इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्वात कमी १५.९३ टक्के मतदान झाले आहे. तर पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक ३२.७० टक्के मतदान झाले आहे.
लोकसभा मतदानाच्या पाचव्या टप्प्यात आज ८ राज्यांमधील ४९ जागांवर मतदान होत आहे. यामध्ये बिहार, जम्मू आणि काश्मीर, लडाख, झारखंड, महाराष्ट्र, ओडिशा, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल यांचा समावेश आहे. उर्वरित राज्यातील मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे; बिहार २१.११%, जम्मू आणि काश्मीर २१.३७%, झारखंड २१.१८%, लडाख २७.८७%, ओडिशा २१.०७%, उत्तर प्रदेश २७.७६% मतदान झाले आहे.
लोकसभा निवडणुका सात टप्प्यात होत आहेत. निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी 19 एप्रिल रोजी, दुसऱ्या टप्प्यासाठी 26 एप्रिल रोजी, तिसऱ्या टप्प्यासाठी 7 मे रोजी आणि चौथ्या टप्प्यासाठी 13 मे रोजी मतदान झाले आहे. यानंतर आज 20 मे रोजी मतदानाचा पाचवा टप्पा पार पडत आहे. तर उर्वरित टप्पे 25 मे आणि 1 जून रोजी पार पडणार आहे. त्यानंतर 4 जूनला लोकसभा निवडणूक निकाल जाहीर होणार आहे.