राष्ट्रीय

Lok Sabha Elections : शेवटच्या टप्प्यात ५७ जागांवर उद्या मतदान

Shambhuraj Pachindre

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या सातव्या टप्प्यात ८ राज्य व केंद्रशासित प्रदेशातील ५७ मतदारसंघात उद्या (दि.१) रोजी मतदान होणार आहे. या मतदानासाठी निवडणूक आयोगाने संपूर्ण तयारी केली आहे.

मतदान होणाऱ्या ठिकाणी मतदानकेंद्रे तयार करण्यात आली असून तिथे कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. शेवटच्या टप्प्यात १० कोटी ६ लाख मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये ५ कोटी २४ लाख पुरुष आणि ४ कोटी २८ लाख महिला मतदारांचा समावेश आहे.

अखेरच्या टप्प्यात पंजाब आणि उत्तर प्रदेशातील सर्वाधिक १३ जागांवर मतदान होत आहे. याशिवाय पश्चिम बंगाल (९), बिहार (८), उडिसा (६), हिमाचल प्रदेश (४), झारखंड (३), चंडीगडमधील एका जागेवर मतदान होणार आहे. त्यानंतर ४ जून रोजी निवडणूक निकाल लागणार आहे.

मतदान पार पडताच सगळ्यांच्या नजरा "एक्झिट पोल' कडे लागणार आहे. शेवटच्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच ३ केंद्रीय मंत्र्यांचे नशीब ईव्हीएम मशीनमध्ये बंद होणार आहे. मोदी हे वाराणसी मतदारसंघातून तर केंद्रीय मंत्री डॉ. महेंद्र नाथ पांडेय चंदौली येथून तर, अनुप्रिया पटेल मिर्झापूरमधून आणि राज्यमंत्री पंकज चौधरी महाराजगंज मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.

गेल्या लोकसभा निवडणुकीत या टप्प्यात भाजपने २५ जागा जिंकल्या होत्या. त्यामध्ये उत्तरप्रदेशातील ९ बिहारमधील ५, हिमाचलप्रदेश ४, झारखंड, ओडिसा आणि पंजाबमधील प्रत्येकी २ आणि चंडीगडच्या एका जागेचा समावेश आहे. उत्तरप्रदेशातील सर्वात जास्त १३ पैकी ११ जागा भाजपने जिंकल्या होत्या. यंदा या सर्व जागा जातीय समीकरणात अडकल्या आहेत. कुशीनगर, देवरिया, सलेमपूर, बलिया, महाराजगंज आणि रॉबर्टसगंज मतदारसंघात जातीच्या आधारावर मतांचे विभाजन होण्याची शक्यता आहे.

बिहारमधील पाटलीपुत्र, आरा आणि बक्सरमध्येही जातीय समीकरणामुळे भाजपची वाट अवघड बनली आहे. आरा येथून केंद्रीय मंत्री आर.के. सिंह निवडणूक लढवत आहेत. पाटलीपूत्र येथून राजदचे नेते लालूप्रसाद यादव यांची कन्या मीसा भारती नशीब आजमावत आहेत. मीसा भारती यांची भाजपचे खासदार रामकृपाल यादव यांच्याशी टक्कर आहे. पंजाबमध्ये गेल्यावेळी भाजपने अकाली दलासोबतच्या युतीत २ जागा जिंकल्या होत्या. मात्र, आता भाजप स्वबळावर निवडणूक लढत आहे.

SCROLL FOR NEXT