राष्ट्रीय

Lok sabha Election 2024 Results : आंध्र प्रदेशात टीडीपीला बहुमत! चंद्राबाबू नायडू यांची पंतप्रधान मोदींशी चर्चा

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : Lok Sabha Election Results : देशभरात लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीसोबतच आंध्र प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीचीही मतमोजणी सुरू आहे. आतापर्यंतच्या ट्रेंडनुसार चंद्राबाबू नायडू यांचा पक्ष टीडीपीला प्रचंड बहुमत मिळताना दिसत आहे. ट्रेंडवरून असे दिसते की टीडीपी येथे स्वबळावर सरकार स्थापन करू शकते. मात्र, तेलुगू देसम पक्ष (टीडीपी) आणि भारतीय जनता पक्ष (भाजप) यांनी राज्यात एकत्र निवडणुका लढवल्या आहेत. दरम्यान, नायडू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवर चर्चा केली आहे.

आंध्र प्रदेशात कोणत्या पक्षाची स्थिती काय?

आंध्र प्रदेशात टीडीपी 130 जागांवर आघाडीवर आहे. YSRCP आणि JNP प्रत्येकी 19 जागांवर आघाडीवर आहेत. त्याचबरोबर भाजप 7 जागांवर आघाडीवर आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी राजीनाम्यासाठी राज्यपालांकडे 4 वाजताची वेळ मागितली आहे. वायएस जगन आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार आहेत. जगन मोहन रेड्डी आपला राजीनामा राज्यपाल एस अब्दुल नजीर यांच्याकडे सोपवणार आहेत. सध्या ते सहकाऱ्यांसोबत अंतर्गत बैठक घेत आहेत.

टीडीपीने 144 जागांवर निवडणूक लढवली होती

आंध्र प्रदेशमध्ये 13 मे रोजी लोकसभा निवडणुकीसोबतच निवडणुका झाल्या होत्या. मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली वायएसआरसीपीने सर्व 175 जागा लढवल्या. एन चंद्राबाबू नायडू यांच्या नेतृत्वाखाली टीडीपीने 144 जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. याशिवाय अभिनेता पवन कल्याणच्या नेतृत्वाखालील जनसेना पक्षाने (जेएसपी) 21 जागा लढवल्या होत्या, तर भाजपने 10 जागांवर निवडणूक लढवली होती. आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी 2,387 उमेदवार रिंगणात होते.

SCROLL FOR NEXT