राष्ट्रीय

India Economy : कर्जाचे व्याज दर वाढणार, अर्थगतीही मंदावणार : ‌‘गोल्डमन सॅक्स‌’ने वर्तविला अंदाज

Iran War impact on economy : होर्मुझ सामुद्रधुनीतील जलवाहतूक एप्रिलच्या मध्यावधीपर्यंत ठप्प राहील.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : कच्च्या तेलाचे वाढलेले दर, कोसळता रुपया, यामुळे रेपो दरात अर्धा टक्का वाढ केली जाईल. तसेच, कॅलेंडर वर्ष 2026 मध्ये भारताची अर्थगती मंदावेल, असा अंदाज ‌‘गोल्डमन सॅक्स‌’ने वर्तविला आहे.

युद्धापूर्वी ‌‘गोल्डमन सॅक्स‌’ने भारतीय अर्थव्यवस्था 2026 मध्ये 7 टक्क्यांनी वाढेल, असा अंदाज वर्तविला होता. युद्धानंतर निर्माण झालेल्या स्थितीत भारतीय अर्थव्यस्था 5.9 टक्क्यांनी वाढेल, असा सुधारित अंदाज व्यक्त केला आहे. द वॉल स्ट्रीट बँकेने दक्षिण आशियाई देशांची अर्थव्यवस्था घटून 6.5 टक्क्यांवर येईल, असा अंदाज नुकताच वर्तविला आहे.

युद्धामुळे कच्च्या तेलाच्या पुरवठ्यात झालेली घट, इंधनाच्या वाढलेल्या किमती, इंधनपुरवठा सुरळीत होण्याचा कालावधी लांबल्यास होणारे संभाव्य नुकसान, रुपयाचे अवमूल्यन, महागाईवरील गृहीतकात बदल झाल्याने ‌‘गोल्डमन सॅक्स‌’ने भारताबाबतचा अंदाज बदलला आहे. कारण, भारत इंधनासाठी मोठ्या प्रमाणावर विदेशावर अवलंबून आहे.

‌‘गोल्डमन सॅक्स‌’च्या अंदाजानुसार, होर्मुझ सामुद्रधुनीतील जलवाहतूक एप्रिलच्या मध्यावधीपर्यंत ठप्प राहील. त्यानंतर ती सुरळीत होण्यास 30 दिवसांचा कालावधी लागेल. ब्रेंट क्रूड ऑईलचे मार्च महिन्यातील सरासरी भाव 105 डॉलर्स प्रतिबॅरल आहेत. एप्रिलमध्ये हे दर 115 डॉलर्स प्रतिबॅरल राहतील. नंतर त्यात 80 डॉलर्सपर्यंत घट होईल. तसेच, 2026 मध्ये महागाई निर्देशांक 4.6 टक्क्यांवर येईल. यापूर्वी 3.9 टक्क्यांचा अंदाज वर्तविला होता.

कमकुवत चलनाची चिंता

कॅलेंडर वर्ष 2025 मध्ये एका डॉलरच्या तुलनेत रुपयाचा भाव 4.7 टक्क्यांनी घटला आहे. तर, 2026 मध्ये आतापर्यंत डॉलरच्या तुलनेत रुपया 4 टक्क्यांनी घसरला आहे. बुधवारी (दि. 24) एका डॉलरचा भाव 93.95 रुपये होता, तर 1 जानेवारी 2026 रोजी एका डॉलरचा भाव 89.95 रुपये होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT