पुढारी ऑनलाईन डेस्क : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याच्या आरोपाखाली आणि कोलकाता रुग्णालयात बलात्कार आणि हत्या करण्यात आलेल्या प्रशिक्षणार्थी डॉक्टरची ओळख उघड केल्याप्रकरणी एका २३ वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थ्यीनीला अटक करण्यात आली आहे. कोलकाता पोलिसांनी रविवारी कीर्ती शर्मा या विद्यार्थ्यीनीला तिच्या लेक टाऊन येथील घरातून अटक केली.
कोलकात्यातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरची बलात्कार करून हत्या करण्यात आली. या घटनेशी संबंधीत पोस्ट कीर्ती शर्माने इंस्टाग्रामवर शेअर केली होती. तिच्या पोस्टमध्ये बलात्कार पीडितेचा फोटो आणि ओळख उघड झाली, हा एक दंडनीय गुन्हा आहे. तसेच कीर्ती हिने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली होती. या पोस्ट प्रक्षोभक स्वरूपाच्या आणि सामाजिक अशांतता भडकवणाऱ्या, समुदायांमध्ये द्वेष वाढवण्यासारख्या होत्या, असा पोलिसांचा दावा आहे. कोलकाता येथील एका पोलीस स्टेशनमध्ये तिच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनंतर पोलिसांच्या पथकाने रविवारी दुपारी शर्माला अटक केली. तिला आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. यापूर्वी, कोलकाता पोलिसांनी माजी भाजप खासदार लॉकेट चॅटर्जी आणि दोन उच्च डॉक्टरांना पीडित महिला डॉक्टरची ओळख उघड केल्याबद्दल समन्स जारी केले होते.