LK Advani health update
नवी दिल्ली: भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना छातीत संसर्ग झाल्याने शुक्रवारी सायंकाळी दिल्लीतील इंद्रप्रस्थ अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ९८ वर्षीय अडवाणी यांच्यावर सध्या श्वसनविकार तज्ज्ञांच्या देखरेखीखाली उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.
शुक्रवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास अडवाणी यांना रुग्णालयात आणण्यात आले. डॉक्टरांचे एक विशेष पथक त्यांच्या आरोग्यावर सतत लक्ष ठेवून आहे. वाढत्या वयामुळे उद्भवणाऱ्या आरोग्यविषयक समस्यांमुळे अडवाणी यांना मे महिन्यातही काही दिवस याच रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर प्रकृतीत सुधारणा झाल्यावर त्यांना घरी सोडण्यात आले होते.
अडवाणी यांनी भारतीय जनता पक्षाच्या उभारणीत आणि विस्तारात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांनी १९८६ ते १९९०, १९९३ ते १९९८ आणि २००४ ते २००५ अशा तीन कार्यकाळात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्षपद भूषवले आहे. अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील रालोआ (NDA) सरकारमध्ये त्यांनी १९९८ ते २००४ दरम्यान केंद्रीय गृहमंत्री म्हणून, तर २००२ ते २००४ दरम्यान देशाचे उपपंतप्रधान म्हणून जबाबदारी सांभाळली होती.
दरम्यान, डिसेंबर २०२४ मध्येही अडवाणी यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे अपोलो रुग्णालयाच्या आयसीयू विभागात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी न्यूरोलॉजिस्ट डॉ. विनीत सुरी यांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार करण्यात आले होते. उपचारानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली होती. सध्याही रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.