नवी दिल्ली; वृत्तसंस्था : मांसाहार आणि अपुर्या झोपेचा स्तनाच्या कर्करोगाशी थेट संबंध असल्याचे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) केलेल्या अभ्यासात स्पष्ट झाले. याबाबत प्रसिद्ध केलेल्या एका अभ्यास अहवालात भारतीय महिलांमधील स्तनाच्या कर्करोगाबाबत चिंताजनक निष्कर्ष समोर आले आहेत.
चुकीचा आहार, जीवनशैलीतील बदल आणि शारीरिक घटकांमुळे देशात स्तनाच्या कर्करोगाच्या रुग्णांमध्ये दरवर्षी सरासरी 5.6 टक्क्यांनी वाढ होत असल्याचे या अभ्यासात म्हटले आहे. दरवर्षी सुमारे 50 हजार नवीन रुग्ण आढळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बंगळूर येथील ‘नॅशनल सेंटर फॉर डिसिज इन्फॉर्मेटिक्स अँड रिसर्च’द्वारे करण्यात आलेल्या या अभ्यासानुसार, मांसाहारी आहार घेणार्या महिलांमध्ये या कर्करोगाचा धोका अधिक आहे. प्रक्रिया केलेले मांस आणि संपृक्त चरबीयुक्त पदार्थ शरीरातील इस्ट्रोजेन हार्मोनची पातळी वाढवतात, जे कर्करोगास कारणीभूत ठरू शकते. तसेच, रात्रीची अपुरी झोप आणि प्रकाशात झोपण्याच्या सवयीमुळे मेलाटोनिन हार्मोनवर परिणाम होऊन कर्करोगाचा धोका वाढत असल्याचे संशोधकांनी स्पष्ट केले आहे.
अभ्यासात असे दिसून आले आहे की, 50 वर्षांनंतर रजोनिवृत्ती आलेल्या महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचा धोका दुपटीने वाढतो. याव्यतिरिक्त, उशिरा लग्न होणे आणि वयाची 30 वर्षे ओलांडल्यानंतर पहिल्या अपत्याला जन्म देणे, हेदेखील महत्त्वाचे जोखीम घटक आहेत.