पुढारी ऑनलाईन डेस्क : "तुझ्या प्रत्येक हालचालीवर आमची नजरआहे. अनेक लोकेशन्सची रेकीही केली आहे. सलमान प्रकरणापासून दूर राहा, नाहीतर कायम स्वरुपी शांत करु," अशी धमकी बिहारमधील अपक्ष खासदार पप्पू यादव यांना बिश्नोई टोळीच्या नावाने मिळाली आहे. त्यांनी या प्रकरणी बिहारच्या पोलीस महासंचालकांकडे तक्रार केली आहे. तसेच अतिरिक्त सुरक्षा वाढवण्याची विनंतीही केली आहे.
खासदार पप्पू यादव यांनी सांगितले की, "लॉरेन्स बिश्नोई टोळीने आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. लॉरेन्स बिश्नोईचे नाव घेऊन मला धमकावण्यात आले आहे. मी बिहारच्या पोलीस महासंचालकांसह आणि पूर्णियाच्या पोलीस महानिरीक्षकणांना याबाबत माहिती दिली आहे." त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र पाठवून त्यांची सुरक्षा ‘वाय’ श्रेणीवरून ‘झेड’ श्रेणीत वाढवण्याची मागणी केली आहे.
पप्पू यादव यांनी सांगिलते की, 'मला सतत धमक्या येत आहेत. माझ्यासोबत कोणतीही अनुचित घटना घडू शकते. सलमान खान प्रकरणापासून दूर राहा, अन्यथा तुला कायमस्वरुपी शांत करु, अशी धमक्की लॉरेन्स बिश्नोई टोळीचा सदस्य असल्याचा दावा करणाऱ्या एका व्यक्तीने व्हॉट्सॲप कॉल करून दिली आहे.
धमकी देणाऱ्या व्यक्तीने दावा केला की, "लॉरेन्स बिश्नोई तुरुंगातील जॅमर बंद करण्यास एक तासाला एक लाख रुपये देतो. पप्पू यादवशी बोलण्याचा तो प्रयत्न करत आहे. मात्र पप्पू यादव फोन उचलत नाही."
बाबा सिद्दीकीच्या हत्येनंतर खासदार पप्पू यादव यांनी बिश्नोई टोळीला आव्हान दिले होते. ते म्हणाले होते की, 'महाराष्ट्रात जंगलराज सुरू आहे. याचा पुरावा म्हणजे वाय सुरक्षा कवच असलेल्या आणि सरकारचे समर्थक समजले जाणारे बाबा सिद्दिकी यांची हत्या करण्यात आली आहे. कायद्याने मला परवानगी दिली तर मी लॉरेन्स बिश्नोई सारख्या दोन टक्का गुन्हेगाराचे संपूर्ण नेटवर्क २४ तासांत उद्ध्वस्त करीन."
लॉरेन्स बिश्नोई टोळीने 12 ऑक्टोबर रोजी मुंबईतील वांद्रे येथे महाराष्ट्राचे माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली होती. आता आपलं पुढील टार्गेट अभिनेता सलमान खानच्या जवळचे लोक असतील, अशी धमकीही दिली होती. बाबा सिद्दीकी हे सलमान खानचे जवळचे मित्र होते.