नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज (दि.२१) दिल्लीमध्ये ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन झाले. लोकसाहित्य आणि लोकसंस्कृतीच्या ज्येष्ठ अभ्यासक-संशोधक डॉ. तारा भवाळकर या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी आहेत. मुख्य उद्घाटन सोहळ्यात पंतप्रधान मोदींसमोर संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर यांच्या झालेल्या भाषणात त्यांनी आपले विचार मांडले.
भाषा बोलली गेली तर जिवंत राहते. केवळ पुस्तकातून आणि ग्रंथातून भाषा जिवंत राहत नाही. ज्या दिवशी आई पहिली ओवी म्हणते त्याच दिवशी एखाद्या व्यक्तीसाठी भाषाही जन्म घेते, असे प्रतिपादन संमेलनाध्यक्षा डॉ. तारा भवाळकर यांनी केले. भाषा तोडणारी नव्हे तर जोडणारी असली पाहिजे, असेही त्या म्हणाल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत उद्घाटनीय कार्यक्रमात भाषण करताना डॉ. तारा भवाळकर म्हणाले की, दोन कमी शंभराव्या संमेलन म्हणणे म्हणजे लोकभाषा आणि ९८ वे संमेलन म्हणजे अभिजात भाषा अशी आपली मराठी भाषा आहे. मंचावर मी किती वेळ बोलायचे यासाठी मला दम भरलाय, त्यामुळे मी मोजका वेळ घेणार आहे, असे मिश्किलपणे म्हटले आणि कार्यक्रमात काही काळ हास्य फुलले.
डॉ. तारा भवाळकर म्हणाल्या की, आपल्या सर्वांचा विठुराया कर्नाटकातून येऊन महाराष्ट्रात स्थिर झाला. वारीला केवळ महाराष्ट्रातून नव्हे तर तेलंगणा, कर्नाटक आणि अनेक ठिकाणाहून लोक येतात. आपल्या संत परंपरेतील थोर लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांसाठी भूमी निर्माण केली होती. आपली मराठी भाषा केवळ लिखित भाषा नाही तर ती बोलीतून पसरत असते. भाषा ही जोडणारी असली पाहिजे तोडणारी नव्हे. आपले संत खरोखर पुरोगामी होते. जात, पात, धर्म, पंथ याच्या पलीकडे जाऊन त्यांनी विचार केला. एखादी स्त्री संमलेनाची अध्यक्ष झाली हा महत्त्वाचा मुद्दा नव्हे तर कर्तृत्व महत्त्वाचे आहे. यंदा संमेलन ज्या ठिकाणी होत आहे त्या ठिकाणाला मराठ्यांचा मोठा इतिहास आहे, असेही त्या म्हणाल्या. आयुष्यात ज्यांना गुरुस्थानी मानते त्या काकासाहेब गाडगीळांच्या ठिकाणी संमेलनाध्यक्षा म्हणून उभी आहे आणि यासाठी शरद पवारांनी इच्छा व्यक्त केली. देशाचे पंतप्रधान या कार्यक्रमाला उपस्थित आहेत, हा अत्यंत आनंदाचा आणि आयुष्यातील अविस्मरणीय गोष्टींपैकी एक योग्य आहे, असे तारा भवाळकर म्हणाल्या.
तारा भवाळकर बोलताना म्हणाल्या की, महाराष्ट्रातील संत खऱ्या अर्थाने पुरोगामी आहेत. जात-पात, धर्म-पंथ, पक्ष, लिंग याच्यापुढे जाऊन त्यांनी विचार केला. अलीकडे काही लोक पुरोगामी शब्दाला उपहासात्मक 'फुरोगामी' म्हणतात. कोणी काहीही म्हणत असले तरी महाराष्ट्रातील संत ते खरंच पुरोगामी होते, असे भवाळकर म्हणाल्या. त्यामुळे पुरोगामी शब्दाला जाणीवपूर्वक आणि उपहासात्मक ‘फुरोगामी’ उच्चारणाऱ्यांना संमेलनाध्यक्ष भवाळकर यांनी थेट सुनावले.
९८ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचा उद्घाटन सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत पार पडला. याप्रसंगी संमेलनाध्यक्षा डॉ. तारा भवाळकर यांनी ८-९ मिनिटांचे छोटेखानी भाषण केले. मात्र त्या भाषणाला उपस्थितांनी भरभरून दाद दिली. त्यांच्या प्रत्येक वाक्याला सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. पुढे तारा भवाळकर भाषण आटोपून आपल्या आसनाकडे जात असताना पंतप्रधानांनी उभे होऊन त्यांना मराठीत 'फार छान भाषण' अशी प्रतिक्रिया दिली तर तारा भवाळकर यांनी लगेच धन्यवाद म्हणत 'मने गुजराती पने गमा छे' (मराठीत- आम्हालाही गुजराती भाषा आवडते) म्हणत पंतप्रधान मोदींना गुजरातीमध्ये प्रतिक्रिया दिली. स्वतः पंतप्रधान मोदी यांनी हा किस्सा त्यांच्या भाषणाच्या सुरुवातीला सांगितला.