चमोली; वृत्तसंस्था : उत्तराखंडमधील चमोली येथील काम सुरू असलेल्या बोगद्यात पाणी आणि .चिखलाचा लोंढा घुसून १० मजूर अडकले. या दुर्घटनेत तीन मजुरांचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे. मुसळधार पावसामुळे झालेल्या भूस्खलनानंतर पाण्याचे लोटच्या लोट बोगद्यात घुसले. त्यामुळे ही दुर्घटना घडल्याचे सांगण्यात येते.
उत्तराखंडमधील चमोली येथील पीपलकोटीमध्ये जलविद्युत प्रकल्पाच्या बोगद्याचे काम सुरू आहे. गुरुवारी संध्याकाळी ३ किमी लांबीच्या या निर्माणाधीन बोगद्यात दरड कोसळली आणि पाण्याचे लोट सुरू झाले. बोगद्यात माती व चिखल साचल्यामुळे २८ मजूर अडकले. वृत्तवाहिन्यांच्या दाव्यानुसार ३ मजुरांचा मृत्यू झाला. बचाव पथकाने आतापर्यंत १८ मजुरांना सुखरूप बाहेर काढले असून, १० जण अद्याप बोगद्यात अडकले आहेत. बाहेर काढलेल्या ३ मजुरांची प्रकृती अतिशय चिंताजनक आहे.