केरळच्या वायनाडमध्ये भूस्खलन, ६० जणांचा मृत्यू file photo
राष्ट्रीय

Wayanad landslide | केरळच्या वायनाडमध्ये भूस्खलन, ६० जणांचा मृत्यू, शेकडो लोक ढिगाऱ्याखाली अडकले

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : केरळच्या वायनाड जिल्ह्यात मंगळवारी सकाळी झालेल्या मुसळधार पावसात मेपाडीजवळील डोंगराळ भागात भूस्खलन होऊन ६० जण ठार झाले असून शेकडो लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. एनडीआरएफ आणि लष्करासह अनेक यंत्रणा बचाव कार्यासाठी तैनात करण्यात आल्या आहेत.

मुंडक्काई, चूरलमला, अट्टामला आणि नूलपुझा ही गावे सर्वाधिक प्रभावित भागात आहेत. भारतीय लष्कराने वैद्यकीय पथकांसह २२५ कर्मचारी तैनात केले आहेत. हवाई दलाची दोन हेलिकॉप्टर, एक Mi-17 आणि एक ALH (Advanced Light Helicopter) देखील मदतकार्यासाठी दाखल झाली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांच्याशी चर्चा केली आणि त्यांना संकटाचा सामना करण्यासाठी केंद्राकडून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. तसेच पंतप्रधान कार्यालयाने भूस्खलनात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना २ लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे. तर जखमींना ५० हजार रुपये मिळणार आहेत. विध्वंसक भूस्खलनानंतर वायनाडमधील बचाव कार्यात तात्काळ समन्वय साधण्याचे निर्देश मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी दिले आहेत. संपूर्ण सरकारी यंत्रणा बचावकार्यात सक्रियपणे सहभागी आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

'या' चार जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट

हवामान विभागाने कोझिकोड, मलप्पुरम, वायनाड आणि कासारगोड या चार जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. पठाणमथिट्टा, अलाप्पुझा, कोट्टायम, एर्नाकुलम, इडुक्की, त्रिशूर आणि पलक्कडमध्ये ऑरेंज अलर्ट आहे. मुसळधार पावसामुळे अनेक रस्ते वाहून गेले आहेत. अनेक ठिकाणी झाडे उपटून पडली आहेत. पुराच्या पाण्यात वाहून गेलेली वाहने झाडांच्या खोडात अडकलेली दिसतात. संततधार पावसामुळे बचाव कार्यात अडथळे येत आहेत.

आरोग्य विभागाकडून नियंत्रण कक्ष सुरू

वायनाड भूस्खलनाच्या पार्श्वभूमीवर, आरोग्य विभागाने जिल्हास्तरीय नियंत्रण कक्ष उघडले आणि आपत्कालीन आरोग्य सेवांसाठी 8086010833 आणि 9656938689 हे दोन हेल्पलाइन क्रमांक जारी केले. वैथिरी, कलपट्टा, मेपाडी, मानंतवाडी रुग्णालयांसह सर्व रुग्णालये सज्ज आहेत. रात्री सर्व आरोग्य कर्मचारी सेवेसाठी दाखल झाले होते. वायनाडमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांची आणखी टीम तैनात केली जाईल: केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज

अमित शहा यांच्याकडून दु:ख व्यक्त

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही दु:ख व्यक्त केले आहे. त्यांनी ट्विटमध्ये लिहिले की, "केरळमधील वायनाड येथे झालेल्या भूस्खलनाच्या घटनांमुळे अत्यंत चिंतेत आहे. एनडीआरएफ युद्धपातळीवर शोध आणि बचाव कार्य करत आहे. दुसरी टीम मदत करण्यासाठी जात आहे. माझ्या संवेदना मृतांच्या कुटुंबीयांप्रति आहेत. तसेच जखमींना लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करतो," असे त्यांनी म्हटले आहे. लोकसभा विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनीही स्थानिक नेत्यांना मदत करण्याचे निर्देश दिले आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT