पुढारी ऑनलाईन डेस्क: हिमाचल प्रदेशातील (Himachal Pradesh) मणिकर्ण येथे मोठे भूस्खलन झाले आहे. या भूस्खलनामुळे एक मोठे झाड कोसळून त्या खाली आलेल्या 6 जणांचा जागीच मृत्यू झाला तर अनेक लोक जखमी झाले आहेत. प्राथमिक माहितीनुसार, 6 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. मृतांमध्ये 3 पर्यटकांचा समावेश आहे.
हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिल्ह्यामधील प्रसिद्ध पर्यटक स्थळ मणिकर्ण गुरुद्वारा येथे भूस्खलनानंतर मोठे झाड रस्त्यावर कोसळल्यामुळे मोठी दुर्घटना घडली. या घटनेत 6 लोक अडकले होते. त्यांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. या घटनेमुळे मणिकर्ण-कसोल मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.
रस्ता बंद झाल्याने प्रशासन तातडीने मार्ग मोकळा करण्यासाठी प्रयत्न करत आहे. तसेच, अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. जिल्हा पोलिसांच्या माहितीनुसार, हा अपघात डोंगरावरून झाड कोसळल्यामुळे झाला. सध्या मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.
फेब्रुवारी महिन्यातही झाले होते भूस्खलन
दरम्यान, कुल्लू जिल्ह्यातील मणिकर्ण खोर्यातील तोष गावात फेब्रुवारी महिन्यात भूस्खलन झाले होते. पावसातच डोंगरावर झालेल्या भूस्खलनामुळे तोष गाव आणि कपिल मोहन हायड्रो पॉवर प्रोजेक्टला धोका निर्माण झाला होता. प्रशासनाने तातडीने संवेदनशील भागातील लोकांना सुरक्षित स्थळी हलवले होते. जीरा नाल्याचे पाणी भूस्खलनामुळे अडवले गेले होते. ज्यामुळे संपूर्ण खोऱ्याला धोका निर्माण झाला होता.