पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रयागराज येथे सुरु असलेल्या महाकुंभ मेळ्यासाठी जाणार्या भाविकांमध्ये चेंगराचेंगरी होऊन १८ लोकांचा मृत्यू झाला आहे. नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर शनिवारी रात्री दहा वाजता घडली. या घटनेमुळे देशभरात महाकुंभ व त्यासाठी होणारी गर्दी यावरुन आता टीका टिप्पणी होत आहे. यात माजी रेल्वे मंत्री राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांचाही समावेश आहे.
रविवारी या चेंगराचेंगरीच्या घटनेवर प्रतिक्रीया देताना त्यांची जिभ घसरली. त्यांनी महाकुंभ मेळ्याला ‘फालतू का महाकुंभ’ असे म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता एका नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. ज्यावेळी लालू प्रसाद यांना विचारण्यात आले की कोट्यवधी भाविक महाकुंभला जमत आहे, या गर्दीचे नियोजन कसे करणे गरजेचे आहे. यावर लालू प्रसाद यादव म्हणाले की ‘कुंभ का कंहा कोई मतलब, है फालतू है कुंभ’ अशा शब्दात त्यांनी आपले मत व्यक्त केले.
लालू प्रसाद यादव यांनी या घटनेसाठी रेल्वे प्रशासनाला जबाबदार धरले आहे. ‘ही घटना खूप वेदनादायी असून यासाठी रेल्वे प्रशासनाचे चुकीचे व्यवस्थापन कारणीभूत आहे. रेल्वेच्या बेजबाबदारपणामुळे १८ लोकांना नाहक जीव गमवावा लागला आहे. रेल्वे मंत्र्यांनी या घटनेची जबाबदारी घ्यायला हवी. मृतांविषयी माझ्या सहवेदना आहेत’ असेही मत त्यांनी व्यक्त केले आहे.
हिंदू धर्मियांसाठी सर्वात पवित्र असलेला हा मेळा प्रयागराज येथे होत आहे. गंगा, यमुना, सरस्वती नद्यांच्या पवित्र संगमावर होणार हा महाकुंभ १४४ वर्षांनी होत आहे. परिणामी दररोज दीड ते दोन कोटी भाविक याठिकाणी पवित्र स्नान करण्यासाठी जमत आहेत. यामुळे प्रयागराजकडे जाण्यासाठी असलेल्या रेल्वेंना तुडूंब गर्दी होत असते. त्यामुळे अशा घटना घडत आहेत. गेल्या रविवारी सर्व प्रयागराज कडे येणाऱ्या सर्व रस्त्यांवर शेकडो किलोमिटर ‘ट्रॅफिक जॅम’ लागला होता.
आता त्यांच्या या विधानांवर विरोधकांनी टीका सुरु केली आहे. बिहार भाजपाचे प्रवक्ते मनोज शर्मा यांनी या वक्तव्यावर ‘राजद च्या हिंदूविषयीच्या भावना आता जनतेसमोर आल्या आहेत. राजदची नेतेंमंडळीच्या मनात हिंदू धर्माविषयी आकस आहे’ अशी प्रतिक्रिया दिली आहे.