Ladakh 
राष्ट्रीय

Ladakh integral part of India | लडाख भारताचा अविभाज्य भाग

चीनच्या नकाराने सत्य बदलत नाही : परराष्ट्र मंत्रालयाचे चोख प्रत्युत्तर

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

लडाखमधील २८ भौगोलिक ठिकाणांचे अधिकृत नामकरण करण्याच्या भारताच्या निर्णयावर चीनने घेतलेला आक्षेप भारताने स्पष्ट शब्दांत फेटाळून लावला आहे. लडाख केंद्रशासित प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग असून चीनच्या सततच्या नकाराने हे ऐतिहासिक आणि भौगोलिक सत्य बदलणार नाही, असा ठाम पवित्रा भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने घेतला आहे.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी चीनचा दावा फेटाळला. जयस्वाल म्हणाले, लडाख हा भारताचा एकात्मिक आणि अविभाज्य भाग आहे. चीनने कितीही नकार दिला, तरी हे प्रस्थापित सत्य बदलणार नाही. केंद्रीय गृह मंत्रालयाने 'सर्व्हे ऑफ इंडिया'च्या अधिकृत नकाशावर २८ ठिकाणांची ओळख पटवून त्यांची नावे नोंदवण्याचा निर्णय घेतला होता. स्थानिक प्रशासन व नागरिकांशी चर्चा करूनच ही प्रक्रिया पूर्ण करत त्याचा उद्देश प्रशासकीय सुलभता व जनजागृती वाढवणे असल्याचे स्पष्ट केले.

चीनचा आक्षेप आणि कुरघोडी

भारताच्या या निर्णयावर प्रतिक्रिया देताना चिनी परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या माओ निंग यांनी सांगितले की, चीनने लडाख या केंद्रशासित प्रदेशाला कधीही मान्यता दिलेली नाही. भारताने २८ ठिकाणांचे केलेले नामकरण बेकायदेशीर आणि अमान्य असल्याचे चीनने म्हटले. यामुळे पश्चिम सीमेवरील वास्तविक स्थिती बदलणार नाही, असा दावाही बीजिंगने केला. चीनने यापूर्वी अरुणाचल प्रदेशातील अनेक ठिकाणांची परस्पर नावे जाहीर केल्यावर भारताने विरोध केला होता.

२८ भौगोलिक ठिकाणांचा समावेश :

भारताने नकाशावर नोंदवलेल्या २८ भौगोलिक ठिकाणांमध्ये १० पर्वतशिखरे, २ खिंडी, ३ पर्वत, ७ भूभाग, २ हिमनद्या (ग्लेशियर्स), २ जलस्रोत, १ दरी आणि १ नदीचा समावेश आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT