नवी दिल्ली; वृत्तसंस्था : सोनम वांगचुक हे लडाखमधील एक ख्यातनाम अभियंता, नवप्रवर्तक आणि शिक्षण सुधारक म्हणून ओळखले जातात. ‘थ्री इडियटस्’ या हिंदी चित्रपटातील ‘फुन्सुक वांगडू’ या पात्रासाठी ते प्रेरणास्रोत ठरले होते. लडाखमधील ‘स्टुडंटस् एज्युकेशनल अँड कल्चरल मूव्हमेंट ऑफ लडाख’ (सेकमोल) या संस्थेचे ते संस्थापक-संचालक आहेत. 1988 मध्ये त्यांनी या संस्थेची स्थापना केली. लडाखमधील शिक्षण पद्धतीतील त्रुटी दूर करण्यासाठी आणि स्थानिक गरजांवर आधारित शिक्षण देण्यासाठी त्यांनी हे पाऊल उचलले.
त्यांनी डिझाईन केलेले सेकमोल कॅम्पस सौर ऊर्जेवर चालते आणि तेथे स्वयंपाक, प्रकाश किंवा गरम करण्यासाठी कोणत्याही जीवाश्म इंधनाचा वापर केला जात नाही, हे विशेष. वांगचुक यांनी 1994 मध्ये ‘ऑपरेशन न्यू होप’ सुरू करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. या उपक्रमामुळे शासकीय शाळांच्या शिक्षण पद्धतीत सुधारणा घडवून आणण्यासाठी सरकार, ग्राम समुदाय आणि नागरी समाज यांच्यात सहकार्य निर्माण झाले.
वांगचुक यांच्या सर्वात महत्त्वाच्या शोधांपैकी एक म्हणजे ‘आईस स्तूपा’ तंत्रज्ञान. हे कृत्रिम हिमनदी (ग्लेशियर) तयार करते. शंकूच्या आकाराचे हे बर्फाचे ढीग हिवाळ्यातील पाणी साठवण्यासाठी वापरले जातात आणि उन्हाळ्यात पाण्याची गरज असताना हळूहळू वितळून शेतकर्यांना उपयोगी पडतात.
लडाखला राज्य म्हणून संवैधानिक सुरक्षा मिळवण्याच्या मागणीसाठी ते गेल्या काही वर्षांपासून आंदोलनात सक्रिय आहेत. लडाखला भारतीय संविधानाच्या सहाव्या अनुसूचीमध्ये समाविष्ट करण्याची त्यांची मुख्य मागणी आहे. याच मागणीसाठी त्यांनी अनेकदा उपोषण केले आहे, ज्यात अलीकडील मोठी उपोषणे आणि दिल्लीपर्यंतचा पायी मोर्चा यांचा समावेश आहे. त्यांच्या या आंदोलनामुळे आणि वक्तव्यांमुळे अलीकडेच लडाखमध्ये झालेल्या हिंसक आंदोलनासाठी केंद्र सरकारने त्यांच्यावर ठपका ठेवला होता.
शिक्षण, पर्यावरण आणि सामाजिक न्यायासाठी त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे. त्यांच्या योगदानासाठी त्यांना 2018 मध्ये रॅमन मॅगसेसे पुरस्कारासह अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे