पुढारी ऑनलाईन डेस्क : जम्मू आणि काश्मीरमधील राजकीय स्थितीमध्ये १९९०च्या दशकानंतर सातत्याने बदल झाले आहेत. केंद्र सरकारने जम्मू आणि काश्मीरचे केलेले विभाजन, कलम ३७० रद्द करणे, जम्मू काश्मीर आणि लडाख केंद्रशासित प्रदेश बनवणे असे काही ठळक बदल आपल्याला दिसतात. पण या संपूर्ण बदलातर एक चित्र १९९६पासून कायम दिसते, ते म्हणजे कुलगाम मतदारसंघातून होत असलेला डाव्या पक्षांचा विजय.
१९९६पासून या मतदारसंघातून कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे (मार्क्सवादी) नेते मोहम्मद युसूफ तारिगामी सातत्याने विजयी होत आहेत. त्यांच्या विरोधात आतापर्यंत काँग्रेस, नॅशनल कॉन्फरन्स, पीडीपी अशा सगळ्याच पक्षांनी वेळोवेळी उमेदवार दिले आहेत, पण कुलगामच्या मतदारांनी नेहमीच तारिगामी यांनाच निवडून दिले आहे. यावेळी बंदी घालण्यात आलेली जमाते ए इस्लामी या संघटनेने पाठिंबा दिलेले अपक्ष उमेदवार सयार अहमद रेशी यांचा त्यांनी पराभव केला.
कुलगाम हा मुस्लिमबहुल मतदारसंघ आहे. त्यामुळे रेशी यांनी प्रचार करताना 'माझा पराभव म्हणजे इस्लामचा पराभव' असा प्रचार केला होता. पण मतदारांनी रेशी यांना साफ नाकारले.
तारिगामी यांनी या वेळी The People's Alliance for Gupkar Declaration (PAGD)ने पाठिंबा दिला होता. पण रेशी यांच्या उमेदवारीमुळे तारिगामी यांच्या पुढे आव्हान निर्माण होईल, असे चित्र होते.
कुलगाममध्ये तारिगामी यांनी इस्लामी कट्टरपंथीय उमेदवाराचा पराभव करणे हा लोकशाही विचारांच्या बाजूने संदेश मानला जात आहे. "कॉम्रेड तारिगामी यांचा विजय म्हणजे लोकशाही आणि धर्मनिरपेक्ष विचारांसाठी घेतलेली एक बळकट भूमिका आहे. भाजप तसेच जमात ए इस्लामीने तारिगामी यांचा पराभव करण्याचे प्रयत्न केले, पण कुलगाममधील लोक आमच्या विचारांच्या बाजूने ठाम राहिले," असे केरळचे कायदामंत्री पी. राजीव यांनी म्हटले आहे.
तारिगामी यांचा जन्म १९४९चा, त्यांचे वडीलही डाव्या विचारांचे होते. जम्मू आणि काश्मीरमधील विद्यार्थी आणि शेतकरी चळवळीतून त्यांचे नेतृत्व पुढे आले. तारिगामी यांनी बऱ्याच वेळा तुरुंगवासही भोगला आहे. तारिगामी यांनी या निवडणुकीत प्रचार करताना आतापर्यंत केलेल्या विकासकामांवर भर दिला. "हक का हामी, तारिगामी" ही घोषणा त्यांच्या कार्यकर्त्यांनी दिली होती. 'न्यायाचा पुरस्कर्ता म्हणजे तारिगामी,' असा या घोषणेचा अर्थ होतो. कुलगामच्या जनतेने ही घोषणा मनापासून स्वीकारल्याचे याही निवडणुकीत दिसून आले.