Kulgam encounter
श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात सुरक्षा दले आणि दहशतवाद्यांमध्ये सुरू असलेल्या चकमकीत सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. जवानांनी आतापर्यंत एका दहशतवाद्याला ठार केले असून, लपून बसलेल्या इतर दहशतवाद्यांसाठी परिसराची नाकेबंदी करून शोधमोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे. भारतीय लष्कराच्या चिनार कॉर्प्सने ही माहिती दिली आहे.
हे सर्व दहशतवादी लष्कर-ए-तोयबाच्या TRF (The Resistance Front) या गटाशी संबंधित आहेत. हे दहशतवादी नुकत्याच झालेल्या पहलगाम हल्ल्याशी संबंधित असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. शुक्रवारी संध्याकाळी कुलगाम जिल्ह्यातील देवसर येथील अखल वनक्षेत्रात काही दहशतवादी लपून बसल्याची गुप्त माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे लष्कर, जम्मू-काश्मीर पोलिसांचे विशेष अभियान गट (SOG) आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (CRPF) जवानांनी संयुक्तपणे या वनक्षेत्रात शोधमोहीम सुरू केली.
जवानांनी परिसराला वेढा घालत शोध सुरू करताच, दबा धरून बसलेल्या दहशतवाद्यांनी त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार सुरू केला. जवानांनीही तातडीने प्रत्युत्तर देत गोळीबार केला. काही काळ दोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार झाला, मात्र अंधाराचा फायदा घेत दहशतवादी घनदाट जंगलात पळून जाण्यात यशस्वी झाले. यानंतर सुरक्षा दलांनी अत्यंत सावधगिरी बाळगत संपूर्ण परिसराचा वेढा अधिक घट्ट केला आणि रात्रभर कडक पहारा ठेवला. आज सकाळी पुन्हा शोधमोहीम सुरू करण्यात आली असता, सुरक्षा दलांना एका दहशतवाद्याला ठार करण्यात यश आले. लष्कराच्या चिनार कॉर्प्सने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर पोस्ट करून या कारवाईची माहिती दिली आणि ऑपरेशन अद्याप सुरू असल्याचे सांगितले.