राष्ट्रीय

Nuclear Plant Data Leak : कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्पाचा संवेदनशील डेटा डार्क वेबवर लीक, रिलायन्स ग्रुपच्या सर्व्हरवरून चोरी?

देशातील सर्वात मोठ्या अणुऊर्जा प्रकल्पाच्या सुरक्षेबाबत चिंता; ‘वर्ल्ड लीक्स’ या रॅन्समवेअर टोळीचा हात

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : भारतातील सर्वात मोठा अणुऊर्जा प्रकल्प असलेल्या तामिळनाडूतील कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्पाशी संबंधित अत्यंत संवेदनशील कागदपत्रे आणि नकाशे डार्क वेबवर लीक झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ‘वर्ल्ड लीक्स’नावाच्या कुप्रसिद्ध रॅन्समवेअर टोळीने हा डेटा आपल्या वेबसाईटवर प्रसिद्ध केला आहे. हा डेटा अनिल अंबानी यांच्या रिलायन्स ग्रुपकडून चोरीला गेल्याचा दावा या हॅकर्सनी केला आहे. रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरकडे या प्रकल्पाच्या युनिट ३ आणि युनिट ४ च्या उभारणीचे कंत्राट आहे.

या लीक झालेल्या डेटा फाईल्‍समध्ये प्रकल्पाचे ब्ल्यू प्रिंटस्‌ (नकाशे), व्हेंटिलेशन आणि कूलिंग सिस्टीमची रचना, नियंत्रण कक्षाचा आराखडा आणि पुरवठादारांची माहिती समाविष्ट आहे. रिलायन्स ग्रुपने या प्रकरणाला दुजोरा दिला असून, ‘योट्टा’ या थर्ड-पार्टी डेटा सेंटर सर्व्हरवरून डेटा अंशतः लीक झाल्याचे मान्य केले आहे. या सायबर हल्ल्याची माहिती सरकारला देण्यात आली असून तपास यंत्रणा कामाला लागल्या आहेत.

देशाच्या सुरक्षेला मोठा धोका?

अणू सुरक्षातज्ज्ञांच्या मते, लीक झालेला डेटा मुख्य न्यूक्लियर रिॲक्टरशी संबंधित नसला, तरी प्रकल्पाच्या अंतर्गत सहायक यंत्रणांची माहिती शत्रूच्या हाती लागणे अत्यंत धोकादायक ठरू शकते. हॅकर्स या माहितीचा वापर करून प्रकल्पातील त्रुटी शोधू शकतात. यापूर्वी २०१९ मध्येही कुडनकुलम प्रकल्पाच्या प्रशासकीय नेटवर्कवर उत्तर कोरियाच्या हॅकर्सनी सायबर हल्ला केला होता.

१) १९,००० संवेदनशील फाईल्‍स लीक : हॅकर्सनी एकूण ८.५ लाख फाईल्‍समधून कुडनकुलम प्रकल्पाशी संबंधित अत्यंत संवेदनशील अशा तब्बल १९,००० फाईल्‍स डार्क वेबवर सार्वजनिक केल्या आहेत.

२) कूलिंग आणि नियंत्रण कक्षाचे नकाशे चोरीला : लीक झालेल्या कागदपत्रांमध्ये प्रकल्पाच्या कूलिंग सिस्टीम आणि मुख्य नियंत्रण कक्षाचा संपूर्ण आराखडा समाविष्ट आहे.

३) रॅन्समवेअर टोळीचा इतिहास : डेटा लीक करणारी ‘वर्ल्ड लीक्स’ या टोळीने यापूर्वी टाटा ग्रुप आणि नायकेसारख्या मोठ्या कंपन्यांना लक्ष्य केले होते.

४) भारतात सायबर सुरक्षेची कमतरता : जागतिक अहवालानुसार, सायबर हल्ल्यांच्या बाबतीत भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर असून ७३ टक्‍के भारतीय कंपन्यांना त्यांच्यावर सायबर हल्ला झाला आहे की नाही याची कल्पनाच नसते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT