नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी कोलकाता आरजी कार हॉस्पिटल बलात्कार आणि हत्या प्रकरणी सुनावणी झाली. सुनावणी वेळी न्यायालयाने विकिपीडियाला या प्रकरणातील पीडितेचे नाव त्याच्या पृष्ठांवरून काढून टाकण्याचे निर्देश दिले.
सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड, न्यायमूर्ती जे. बी. पार्डीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. सुनावणीदरम्यान, सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी खंडपीठाला माहिती दिली की, विकिपीडियावर अजूनही पीडितेचे नाव आणि छायाचित्र आहे. त्यानंतर न्यायालयाने हे निर्देश दिले. सुनावणी वेळी खंडपीठाने पश्चिम बंगाल सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेवर नापसंती व्यक्त केली. या अधिसूचनेत सरकारने महिला डॉक्टरांसाठी रात्रपाळी टाळावी असे म्हटले आहे. सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड म्हणाले की, राज्य महिलांची सुरक्षा वाढवण्याऐवजी महिला डॉक्टरांनी रात्री काम करू नये असे म्हणू शकत नाही. त्यानंतर पश्चिम बंगाल सरकारच्या वतीने उपस्थित असलेले जेष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी न्यायालयाची टिप्पणी ऐकून अधिसूचनेत बदल करण्याचे मान्य केले.
या प्रकरणातील केंद्रीय अन्वेषण ब्यूरोने दाखल केलेल्या स्थिती अहवालातील खुलासे "विचलित करणारे" असल्याचे निरीक्षण खंडपीठाने सुनावणीवेळी नोंदवले. तथापि, न्यायालयाने सीबीआयने दिलेला तपशील सांगण्यास नकार दिला, कारण खुलासेमुळे तपासात अडथळा येऊ शकतो.