Kolkata doctor rape case
कोलकाता येथील सरकारी हॉस्‍पिटलमध्‍ये पदव्युत्तर प्रशिक्षणार्थी डॉक्‍टर महिलेवर झालेला बलात्‍कार आणि निर्घृण हत्‍या प्रकरणातील आराेपीने पाेलिसांसमाेर गुन्‍ह्यांची कबुली दिली आहे.  Representative image
राष्ट्रीय

नराधमाने भयंकर गुन्‍ह्यापूर्वी दारु ढोसली, पॉर्न व्हिडिओही पाहिला!

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : कोलकातामधील सरकारी हॉस्‍पिटलमध्‍ये पदव्युत्तर प्रशिक्षणार्थी डॉक्‍टर महिलेवर झालेला बलात्‍कार आणि निर्घृण हत्‍येने संपूर्ण देश हादरला आहे. या प्रकरणी हॉस्‍टिटलमधील नागरी स्वयंसेवक संजय रॉय याला अटक करण्‍यात आली आहे. पोलिस तपासात आराेपीबाबत अनेक धक्‍कादायक माहिती उजेडात आल्‍याचे वृत्त 'इंडिया टूडे'ने दिले आहे. ( Kolkata doctor rape case )

गुन्ह्यापूर्वी दारू ढोसली, पॉर्न व्हिडिओही पाहिला

कोलकाता रुग्णालयात पदव्युत्तर प्रशिक्षणार्थी डॉक्टरचा बलात्कार आणि खून केल्याच्या प्राथमिक तपासात स्‍पष्‍ट झाले आहे. आरोपी संजय रॉय गुन्हा घडला त्यादिवशी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास संजय हॉस्पिटलमागील एका ठिकाणी दारू पिण्यासाठी गेला होता. तो तेथे दारू पिऊन पॉर्न व्हिडिओ पाहत असे. पोलिसांना संजय रॉयच्या मोबाइल फोनमध्‍ये शेकडाे हिंसक पॉर्न व्हिडिओ असल्‍याचे दिसून आले. त्‍याच्‍या फोनमधील पॉर्न व्हिडिओ पाहिल्‍यावर पोलीसही हादरले. संजय रॉय हा एक विकृत आणि मनोरुग्‍ण असल्‍याचे स्‍पष्‍ट होत असल्‍याचेही पोलिसांनी म्हटले आहे.

कोलकातामधील सरकारी आरजी कार मेडिकल कॉलेजच्‍या सेमिनार विभागात पदव्युत्तर प्रशिक्षणार्थी ३१ वर्षीय महिला डॉक्‍टरचा रक्तबंबाळ अवस्थेतील अर्धनग्न मृतदेह शुक्रवारी आढळून आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती.शवविच्छेदन अहवालात पीडितेच्या प्रायव्हेट पार्टमधूनही रक्तस्त्राव होत असल्याचे दिसून आले. तिच्या पोटात, डाव्या पायाला, मानेला, उजव्या हातात, अनामिका आणि ओठांना जखमा झाल्‍याचेही आढळले होते.

नराधम संजय रॉयने केला पुरावा नष्‍ट करण्‍याचा प्रयत्‍न

अधिक तपासात असे दिसून आले की, गुन्हा केल्यानंतर रॉयने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्याने घटनास्थळावरून रक्ताचे डाग धुवण्याचा प्रयत्न केल्याचेही पोलिसांना आढळले आहे. पोलिसांनी जप्‍त केलेल्‍या सीसीटीव्ही फुटेजमध्ये पहाटे ४:४५ वाजता रॉय सेमिनार रूममधून बाहेर पडताना दिसत आहेत. रॉय हॉस्‍पिटलच्‍या दुसर्‍या खोलीत जावून झोपला होता. येथे त्‍याला पोलिसांनी अटक केली तेव्‍हाही तो दारूच्या नशेत होता.रॉय यांना 23 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून, त्यांच्यावर बीएनएसच्या कलम 64 (बलात्कार) आणि 103 (हत्या) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खून प्रकरणात इअरफोनचा पुरावा

आरोपी संजय रॉय याचा इअरफोन घटनास्थळावरून पोलिसांनी जप्त केला आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्येही आरोपी संजय हा पहाटे ४ वाजता सेमिनार हॉलमध्ये जाताना दिसत आहे. जाताना त्याच्या कानात इअरफोन दिसत आहे, परततानाच्या दृश्यात मात्र इअरफोन दिसत नाही. मोबाईल आणि इअरफोनची क्रॉस चेकिंग केली असता फक्त संजयच्या मोबाईलला घटनास्थळी आढळून आलेला इअरफोन काही वेळापूर्वी कनेक्ट होता, असेही स्पष्ट झाले आहे. चौकशीत संजयने स्वतः बलात्कार आणि खून केल्याची कबुली दिलेली आहे. एवढे पुरावे त्याला कठोर शिक्षेसाठी पुरेसे असल्याचे कायद्याच्या जाणकारांतून सांगितले जात आहे.

आरोपीची ४ लग्ने, गैरवर्तणुकीमुळे तीन पत्‍नी सोडून गेल्‍या

आरोपी संजय रॉय याने एकापाठोपाठ ४ लग्ने केली होती. याआधीच्या ३ पत्नी त्याच्या गैरवर्तणुकीमुळे त्याला सोडून गेल्या आहेत, अशी माहितीही रविवारी पोलिसांना उपलब्ध झाली आहे. मृत ३१ वर्षांच्या तरुणीचा शवविच्छेदन अहवालही प्राप्त झाला आहे.

SCROLL FOR NEXT