कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल येथे निदर्शने करणारे डॉक्टर आणि विद्यार्थी.  (Image source- PTI)
राष्ट्रीय

दर २ तासांनी अहवाल पाठवा, कोलकाता घटनेनंतर केंद्राचा राज्यांना आदेश

Kolkata doctor rape-murder case | कोलकाता घटनेनंतर गृहमंत्रालयाचे मोठे पाऊल

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन डेस्क

कोलकातामधील प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार आणि हत्या प्रकरणी (Kolkata doctor rape-murder case) देशभरात संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेच्या निषेधार्थ देशभरात डॉक्टरांची निदर्शने सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह मंत्रालयाने (Union Home Ministry) सर्व राज्यांना एक आदेश जारी केला आहे. राज्यांना दर दोन तासांनी कायदा आणि सुव्यवस्थेच्या स्थितीबाबत अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे.

केंद्रीय गृह मंत्रालयाने सर्व राज्यांच्या पोलीस दलांना दर दोन तासांनी ईमेल, फॅक्स अथवा व्हॉट्सॲपद्वारे अहवाल पाठवण्याचे निर्देश दिले आहेत. "या संदर्भात सतत दोन तासांनी कायदा आणि सुव्यवस्थेचा अहवाल गृह मंत्रालयाच्या नियंत्रण कक्षाला (नवी दिल्ली) फॅक्स/ईमेल/व्हॉट्सॲपद्वारे पाठवला जावा," असे केंद्राने जारी केलेल्या अधिकृत अधिसूचनेत म्हटले आहे. याबाबतचे वृत्त पीटीआय वृत्तसंस्थेने दिले आहे.

९ ऑगस्ट रोजी, ३१ वर्षीय पदव्युत्तर प्रशिक्षणार्थी डॉक्टरचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत सरकारी आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या सेमिनार हॉलमध्ये आढळून आला होता. या प्रकरणी कोलकाता पोलिसांचा नागरी स्वयंसेवक संजय रॉय याला दुसऱ्या दिवशी अटक करण्यात आली. दरम्यान, कोलकाता उच्च न्यायालयाने मंगळवारी या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला.

Kolkata doctor rape-murder case : आरोपीची मनोविश्लेषण चाचणी

आरोपी संजय रॉय याची मनोविश्लेषण चाचणी केली जाणार आहे. त्यासाठी सीबीआयने दिल्लीच्या सेंट्रल फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (CFSL) मधील तज्ज्ञांच्या टीमला कोलकाता येथे बोलावले आहे.

वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेबाबत समिती स्थापन करणार

दरम्यान, कोलकाता येथील घटनेनंतर, डॉक्टरांच्या विविध संघटनांनी डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेबाबत ठोस उपाययोजना करण्याची मागणी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे केली आहे. या मागणीची दखल घेत सुरक्षेबाबतच्या सर्व संभाव्य उपाययोजना सुचवण्यासाठी एक समिती स्थापन करण्याचे आश्वासन केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिले आहे. याबरोबरच मंत्रालयाने डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी सर्व शक्य प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT